दंत चिकित्सासाठी यंत्रसामग्री उपलब्ध; कायमस्वरूपी डॉक्टरअभावी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:49+5:302021-07-26T04:19:49+5:30

किल्लारी : खेड्यापाड्यातील रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून किल्लारी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. येथील रुग्णालयात चार महिन्यांपूर्वी दंत ...

Dental equipment available; Permanent problem of lack of doctor | दंत चिकित्सासाठी यंत्रसामग्री उपलब्ध; कायमस्वरूपी डॉक्टरअभावी अडचण

दंत चिकित्सासाठी यंत्रसामग्री उपलब्ध; कायमस्वरूपी डॉक्टरअभावी अडचण

किल्लारी : खेड्यापाड्यातील रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून किल्लारी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. येथील रुग्णालयात चार महिन्यांपूर्वी दंत चिकित्सासाठी आवश्यक ती यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात येऊन कक्षही सुरू करण्यात आला. परंतु, कायमस्वरूपी दंत चिकित्सक नसल्याने ही यंत्रणा चार महिन्यांपासून धूळ खात पडून आहे.

औसा तालुक्यातील किल्लारी हे मोठे बाजारपेठेचे गाव असून, लातूर- उमरगा राज्य मार्गावर आहे. किल्लारीचा परिसरातील २५ ते ३० खेड्यांचा दैनंदिन संबंध येतो. परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिक खरेदी, दवाखान्यासाठी येथे येतात. या भागातील रुग्णांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून काही वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. हे रुग्णालय ३० खाटांचे असून, एक वैद्यकीय अधीक्षक आणि तीन वैद्यकीय अधिकारी आहेत. नेत्ररोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. परिसरातील जवळपास ४० गावांतील रुग्ण येथे आरोग्य सेवा, उपचारासाठी येतात.

दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा वाढविण्यासाठी चार महिन्यांपूर्वी दंत चिकित्सेसाठी आवश्यक ती यंत्रसामग्री जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. कक्षही निर्माण करण्यात आला. तसेच औसा येथील दंत चिकित्सकाची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दंतरोग असलेल्या रुग्णांना उपचार मिळेल, अशी आशा होती. परंतु, दंत चिकित्सक नियमितपणे येत नसल्याने रुग्णांना औसा अथवा लातूरला जावे लागत आहे. परिणामी, वेळ व पैशांचा अपव्यय होत आहे. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही समस्या उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे मांडून कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करावे, अशी मागणी होत आहे.

खासदारांकडे मांडली व्यथा...

किल्लारीच्या ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी दंत चिकित्सक नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे औसा बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव व ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

अतिरिक्त पदभारामुळे अडचण...

येथील ग्रामीण रुग्णालयात औसा येथील एका दंत चिकित्सकाची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्यावर औसा येथील कोविड लसीकरणाचा अतिरिक्त भार असल्यामुळे येथे येणे कठीण होत आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Dental equipment available; Permanent problem of lack of doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.