जळकोट-कंधार बससेवा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:56+5:302021-03-04T04:35:56+5:30
बसफेऱ्या लॉकडाऊनपासून बंद आहेत. इतर बससेवा पूर्ववत झाल्या असल्या तरी ही बसेसेवा अद्याप सुरू करण्यात आली नाही. परिणामी, ...

जळकोट-कंधार बससेवा सुरू करण्याची मागणी
बसफेऱ्या लॉकडाऊनपासून बंद आहेत. इतर बससेवा पूर्ववत झाल्या असल्या तरी ही बसेसेवा अद्याप सुरू करण्यात आली नाही. परिणामी, या मार्गावरील नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी कंधार - जळकोट मार्गे वांजरवाडा बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उदगीर आणि कंधार आगाराच्या कंधार-वांजरवाडा-जळकोट या बस लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आल्या आहेत. अद्यापही त्या बंदच आहेत. गत अनेक महिन्यांपासून बस बंद असल्याने त्या सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची निराशा होत आहे. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी प्रवास सुरू झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, प्रवासी, व्यापारी, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक, दिव्यांग व्यक्ती या सर्वांनाच या बसअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी ८.३० अथवा ९ वाजता जळकोटला जाणारी आणि सायंकाळी ५ वाजता जळकोटहून वांजरवाडा - होकर्णा मार्गे परत कंधारला जाणारी बससेवा सुरू केल्यास विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होणार आहे.
या मार्गावर तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे लक्ष्मण तगडमपले, होकर्णा येथील सरपंच नागीनबाई भुरे, उपसरपंच गोदावरी दिगांबर पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, भानुदास राऊतराव, कृष्णराज भुरे, बापूस दिवानजी, उतम देवकत्ते, जिलानी शेख, रामेश्वर पाटील, निखिल शेकापुरे, माधव बोडके यांच्यासह प्रवाशांनी केली आहे.