संचारबंदीमुळे आंब्यांना मागणी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST2021-05-13T04:19:20+5:302021-05-13T04:19:20+5:30
किराणा दुकानात नियमांचे पालन लातूर : ‘रमजान ईद’च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेची दुकाने मर्यादित कालावधीसाठी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली ...

संचारबंदीमुळे आंब्यांना मागणी घटली
किराणा दुकानात नियमांचे पालन
लातूर : ‘रमजान ईद’च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेची दुकाने मर्यादित कालावधीसाठी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गंजगोलाई परिसरातील बाजारात किराणा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनपा प्रशासनाच्या वतीने किराणा दुकानांसाठी नियमावली ठरवून देण्यात आली आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत व्यवहार पार पाडले जात आहेत.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन
लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्या वतीने गावस्तरावर पेरणी क्षेत्राचे नियोजन केले जात आहे. गावोगावी कृषी साहाय्यक पेरणीविषयी माहिती देत आहेत. जिल्ह्यात सोयाबीनला सर्वाधिक पसंती असून, जवळपास साडेतीन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. बोगस बियाणे आणि खतांच्या किमती याला आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. तालुकास्तरावरही स्वतंत्र पथके नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोनामुक्तीसाठी ग्रामीण भागात जनजागृती
लातूर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी अँटिकोरोना फोर्सच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तसेच गावात येणाऱ्या नागरिकांची चौकशीही केली जात आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर वापरण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. अनेक गावांत तर दवंडीद्वारे जनजागृती केली जात आहे. दरम्यान, कोरोनामुक्तीसाठी ग्रामीण भागात नागरिकांनी पुढाकार घेतला असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
जिल्ह्यातील रेशन दुकानातून धान्य वाटप
लातूर : राज्य शासनाच्या वतीने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मोफत रेशन देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार रेशन दुकानांत धान्य पोहोच करण्यात आले असून, वितरणाला सुरुवात झाली आहे. रेशन दुकानावर कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे गरजेचे असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास चार लाखांहून अधिक रेशन कार्डधारक आहेत. दरम्यान, रेशन दुकानांकडून नियमितपणे वाटप सुरू आहे.