कोरोनाची लक्षणे दिसून येणारे बहुतांश जण कोरोना चाचणी करतात. ज्या दिवशी कोरोना चाचणी केली जाते, त्याच्या तिसऱ्या दिवशी रुग्णास अहवाल प्राप्त होत आहे. या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत कोरोना संशयित रुग्ण घरातच राहतात. जर तो रुग्ण पॉझिटिव्ह आला, तर त्याच्या घरातील इतरांना कोरोनाची लागण होऊ शकते. कोरोना चाचणीचा अहवाल उशिरा येत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जर आरटीपीसीआर अहवाल तत्काळ मिळाला, तर कोरोनाची साखळी थांबविण्यास मदत होईल, असे ही निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर, कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारात रेमडेसिवीर हे प्रभावी औषध असल्यामुळे अनेक मेडिकलवरून या इंजेक्शनच्या बाबतीत रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. सदरील इंजेक्शन किंमत वेगवेगळी आकारण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना सदरील औषध अल्प दरात विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. यासाठी संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी भरतकुमार गायकवाड यांनी केली आहे.
कोरोना चाचणीचे निदान तत्काळ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST