ग्रामपंचायत कालावधीतील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST2021-04-03T04:16:40+5:302021-04-03T04:16:40+5:30
सन २०१६ मध्ये रेणापूर ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायत अस्तित्वात आली. नगरपंचायत निर्माण होऊन ४ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला ...

ग्रामपंचायत कालावधीतील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची मागणी
सन २०१६ मध्ये रेणापूर ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायत अस्तित्वात आली. नगरपंचायत निर्माण होऊन ४ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु, ग्रामपंचायतीपासून काम करणारे सर्व कर्मचारी नगरपंचायतीतही वेगवेगळ्या विभागांत काम करीत आहेत. जिल्ह्यातील इतर नगरपंचायतीत ग्रामपंचायत काळात असलेले कर्मचारी व नंतर नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतीत समायोजन झाले. मात्र, येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा, सफाई कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतीत समायोजन झाले नाही. त्यासंदर्भातील प्रस्तावही वरिष्ठ कार्यालयास पाठविला आहे. त्यासाठी सातत्याने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही या कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले नाही. त्यामुळे येथील नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांना कमी वेतनावर काम करावे लागत आहे.
नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही २४ तास काम करीत आहोत. संबंधितांनी हा प्रश्न सोडवावा, अन्यथा, ग्रामपंचायतीपासून कार्यरत असलेले पाणीपुरवठा, सफाई व कार्यालयीन कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर अंकुश गायकवाड, प्रकाश गुरव, उत्तम चक्रे, सुभाष पोटे, भारत शिंदे, श्रीनाथ बोडके, नंदूबाई चव्हाण, धम्मशीला बोडके, मीराबाई कसबे, नवनाथ पांचाळ, माधव भुतकर, विशाल इगे, विद्या कोदरे, शिवराज कसबे, गोविंद चव्हाण, बाळासाहेब भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.