३० खाटांना ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या यंत्रणेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:11+5:302021-05-14T04:19:11+5:30
सीमावर्ती भागात निलंगा तालुका असल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दूरवरून कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. ५० खाटांच्या डेडिकेटेड कोविड ...

३० खाटांना ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या यंत्रणेचे लोकार्पण
सीमावर्ती भागात निलंगा तालुका असल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दूरवरून कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. ५० खाटांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची मंजुरी असतानाही या ठिकाणी दररोज १०० ते १२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण संख्या जास्त असल्याने रुग्णांना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दवाखाना प्रशासनाची दमछाक होत होती. ही बाब प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर यांना उपजिल्हा रुग्णालयातील भेटीदरम्यान लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांकडे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
तसेच त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदाळे यांच्याशी चर्चा करून एका वार्डातील ३० खाटांना एकाच वेळी ऑक्सिजन पुरवठा कशा पद्धतीने करता येईल, याचा आराखडा तयार करून त्या कामासाठी लागणारा तीन लाखांचा निधी स्वत: पुढाकार घेऊन सचिव संतोष पाटील, हरी सातपुते व अडत व्यापारी अनिल अग्रवाल, दत्ता कोरले, बालाजी उसनाळे, रवींद्र अग्रवाल, विक्रम कठवते, अमर आर्य, अतुल चव्हाण, बाळू बाहेती, शिवकुमार निला, वारद आप्पा तळीखेडकर, माधव गाडीवान यांच्यासह निलंगा बाजार समितीतील सर्व व्यापाऱ्यांनी जमा केला. त्यात अशोकराव पाटील-निलंगेकर यांनी स्वतः मोठा भार उचलत ३० खाटांना ऑक्सिजन सेंटर लाईन, ओटू, इनलेट, आऊटलेट, आदी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन खाटा वाढणार आहेत. जवळपास १०० पेक्षा अधिक ऑक्सिजन खाटांची संख्या पोहोचल्याने रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी लाभ होणार आहे.
यावेळी तहसीलदार गणेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, अनिल अग्रवाल, बालाजी उसनाळे, संतोष पाटील, डॉ. सोळुंके, डॉ. हुगे, डॉ. गिते, डॉ. मदने, डॉ. बंडगर, डॉ. काळे, ईरफान शेख, रामदास सोमवंशी, बाळू सोमाणी, आदी उपस्थित होते.