झाडांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी
लातूर : आधी बांधते राखी झाडाला, मग बांधते माझ्या भावाला...असा उपक्रम वसुंधरा प्रतिष्ठानने राखी पौर्णिमेनिमित्त राबविला. यावेळी महिलांनी झाडांना राखी बांधून संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी उमाकांत मुंडलिक, ॲड. अजित चिखलीकर, विद्या पाल, राहुल माशाळकर, आदींची उपस्थिती होती. दरम्यान, वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने दवाखान्यात जाऊन डॉक्टर्स, नर्स यांच्याकडून राखी बांधून घेतली. कोविड काळात जीव धोक्यात घालून डॉक़्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
राजमाता जिजामाता कॉलेजचे डी.एड. परीक्षेत यश
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन डी.एड.च्या परीक्षेत राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली. महाविद्यालयाचा ९४ टक्के निकाल लागला आहे. स्नेहा चंदेले हिने ८३ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. अंजली जाधव ८२.३६, भाग्यश्री वसमतकर ८२.२४ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय, तृतीय आल्या आहेत. ६७ विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन विशेष प्रावीण्य मिळविले आहे. या विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थाध्यक्ष के. ए. जायेभाये, सचिन डी. एन. केंद्रे यांनी केले आहे.