जळकोट तालुक्यात तलावातील पाणीसाठ्यात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST2021-04-06T04:19:02+5:302021-04-06T04:19:02+5:30
जळकोट येथे १९७२ मध्ये बांधण्यात आलेल्या तलावातील पाणीसाठा आता चक्क जाेत्याखाली आला आहे. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने, जळकोट ...

जळकोट तालुक्यात तलावातील पाणीसाठ्यात घट
जळकोट येथे १९७२ मध्ये बांधण्यात आलेल्या तलावातील पाणीसाठा आता चक्क जाेत्याखाली आला आहे. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने, जळकोट तालुक्यातील पाझर तलाव, प्रकल्पातील, धराणातील पाणीसाठा झपाट्याने घसरत आहे. जळकाेटसारख्या डोंगरी तालुक्यात जवळपास २५० पाझर तलाव आहेत. त्याचबराेबर, १४ साठवण तलाव आहेत. यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने अनेक साठवण तलावात, धरणात मुबलक पाणीसाठा झाला हाेता. काही तलाव तुडुंब भरली हाेती. मात्र, गत आठवड्यापासून उष्णतेची लाट वाढल्याने तलाव, धरणातील जलसाठा कमालीचा घटत आहे. परिणामी, पशुधनांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनाला आहे. जळकोटसाठी १९७२ साली मोठ्या दुष्काळात मोठे धरण बांधण्यात आले आहे. त्या धरणाची पाणी पातळी आता ज्याेत्याखाली आली आहे. धरणाच्या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे, तर काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले आहे. सध्याला ही उन्हाळी पिके बहरली आहेत. मात्र, तलावातील पाणीपातळी खालावल्याने दररोज शेतकऱ्यांना २ पाइप तळ्यात वाढून पाण्याचा उपसा करावा लागत आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. रावणकोळा, आतनूर, माळहिप्परगा, जळकोट, एकुरका, बोरगाव, मरसांगवी तांडा, गव्हाण आदी ठिकाणच्या पाझर तलावातील पाणी घटत आहे, तर जळकाेट आणि तालुक्यातील विंधन विहिरी, गावातील आड, विहिरी, हातपंप बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक विंधन विहिरींना शेवटची घरघर लागली आहे.