लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:24+5:302021-05-14T04:19:24+5:30
लातूर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा - महाविद्यालये बंद आहेत. पुढील सत्रात शाळा सुरू होणार का? या ...

लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार
लातूर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा - महाविद्यालये बंद आहेत. पुढील सत्रात शाळा सुरू होणार का? या संदर्भात सध्या तरी कुठल्याच हालचाली शिक्षण विभागाकडे दिसत नाहीत. शाळा नियमित सुरू करायच्या झाल्यास लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना लसीकरण शाळा कधी सुरू होतील, हे ठरविणार आहे.
जिल्ह्यात जवळपास २,५७० हून अधिक शाळा आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मध्यंतरी नववी, दहावीचे वर्ग ऑफलाईन सुरू करण्यात आले होते. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे वर्ग बंद करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होईल. परिणामी, नियमित शाळा सुरू होतील असा अंदाज वर्तविला जात असला तरी लसीकरण कधी पूर्ण होणार आणि शाळा कधी सुरू होतील, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.
४६ हजार विद्यार्थी थेट दुसरीच्या वर्गात
मागील वर्षी इयत्ता पहिलीच्या वर्गात ४६ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. गतवर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्राथमिकचे वर्ग आजतागायत बंदच ठेवण्यात आले.
पहिलीच्या वर्गातील मुलांनी ना शाळा पाहिली, ना शिक्षकांचा चेहरा. जवळपास ४६ हजार ७७८ विद्यार्थी दुसरीच्या वर्गात गेली आहेत. किमान यंदा तरी शाळा सुरू होती, अशी त्यांना अपेक्षा आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर आहे. शासनाकडून जशा सूचना मिळतील, त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
- विशाल दशवंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. लातूर
पहिलीला प्रवेश घेतला, तेव्हापासून वर्गमित्र आणि शिक्षकांना पाहिले नाही. ऑनलाईन वर्गातही केवळ अभ्यासच घेतला जातो. मित्रांसोबत खेळण्याचा आनंद घेता आलेला नाही. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील आणि वर्गात कधी जाईन.
- यश बुबणे
गेल्या वर्षभरापासून शाळेतील मित्रांची भेट झालेली नाही. त्यामुळे घरी अभ्यास करून कंटाळा येत आहे. शाळेत जाण्यासाठी अनेकदा रडलो . मात्र आईवडिलांनी समजूत घातली आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे.
- अंश कांबळे
शाळेमध्ये दररोज मित्रांना भेटता येत होते. खेळाच्या तासात विविध खेळ खेळता येत होते. मात्र गेल्या दीड वर्षापासून सगळे बंद आहे. घरी केवळ अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे कधी खूप कंटाळा येतो.
- उदयसिंह ठाकूर
शाळा बंदमुळे ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर
n कोरोनाची परिस्थिती असल्याने अनेक शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर दिला आहे. दहावीचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या या संकटकाळात ऑनलाईन अभ्यासाचा उपक्रम प्रभावी आहे.