कर्जाचा सावकारी फास आवळला; दाेन वर्षात ६१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:20+5:302020-12-30T04:26:20+5:30
औसा तालुक्यात जवळपास १ लाख ९ हजार हेक्टर जमिनीचे क्षेत्रफळ आहे. त्यावर जवळपास ८३ हजार शेतकरी शेती करतात. याच ...

कर्जाचा सावकारी फास आवळला; दाेन वर्षात ६१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
औसा तालुक्यात जवळपास १ लाख ९ हजार हेक्टर जमिनीचे क्षेत्रफळ आहे. त्यावर जवळपास ८३ हजार शेतकरी शेती करतात. याच शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवितात. तालुक्यात जलसंधारणाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. परिणामी, शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले असले तरी संपूर्ण तालुकाच अवर्षण प्रवणक्षेत्रात येताे. तालुक्यातून एकही नदी वाहत नसल्याने, धरणांची संख्या नसल्याने शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून रहावे लागते. याच पावसाच्या पाण्यावर शेती करावी लागते. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, कधी रोगराई आणि कधी पिकाला न मिळणारा हमीभाव यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने कर्जाची योजना राबवली आहे; मात्र त्याचाही अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. पीक कर्ज वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आता वाढत आहेत. ज्यांना मिळाले ते अत्यल्प आहे. त्यासाठी अनेक शेतकरी खासगी सावकारांचे कर्ज घेऊन शेतीची कामे करीत आहेत. अशात निसर्गाने दगा दिला आहे. यातूनच खासगी सावकाराच्या कर्जाचा बोजा डाेक्यावर वाढतो आहे. याच कर्जापाेटी तालुक्यातील ६१ शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षात मरणाला कवटाळले आहे.
आत्महत्यांचे सत्र सुरूच...
शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, रामेगाव येथील शेतकरी उत्तम दादाराव शेळके यांनी १९ डिसेंबरला विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. तर वरवडा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दोन्ही शेतकरी घरातील प्रमुख हाेते. त्यांच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. औसा तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. हे सत्र थांबवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी हाेत आहे.
- प्रशांत भोसले, शेतकरी मातोळा.