वांजरवाड-जळकाेट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी धरणे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:25+5:302021-03-04T04:35:25+5:30
जळकोट तालुका हा डोंगरी, मागास आहे. हा तालुका राज्य महामार्गाला जोडण्यासाठी जळकोट-वांजरवाडा या नव्या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. ...

वांजरवाड-जळकाेट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी धरणे आंदाेलन
जळकोट तालुका हा डोंगरी, मागास आहे. हा तालुका राज्य महामार्गाला जोडण्यासाठी जळकोट-वांजरवाडा या नव्या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा रस्ता पूर्वी पाणंद रस्ता होता. आता हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी उपयोगी पडावा, तालुका जवळच्या मार्गाने शिरूर ताजबंद, मुखेड महामार्गाला कमी अंतराने जोडला जावा, यासाठी नागरिकांनी श्रमदानातून एका दिवसात साडेचार किलोमीटरच्या रस्त्याचे मातीकाम केले आहे. त्याच दिवशी मोटार वाहतूक सुरू करून इतिहास घडविला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण केले. आता हा रस्त्यावरून वाहतुकीची सुविधा उपलब्ध हाेणार आहे. सदरचा रस्ता जळकाेट तालुक्यासाठी एकमेव प्रमुख मार्ग असला तरी, सध्या तो अरुंद आहे. त्याचे रुंदीकरण झाल्यास राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, मोठी वाहने या रस्त्यावरून धावतीत. जळकोट हे बाजारपेठेचे ठिकाण असून, शेतकरी, व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणाऱ्या वाहनांना दूर अंतरावरून येथे यावे लागते. परिणामी, इंधन, पैसा आणि वेळ अधिकचा लागताे. या पर्यायी रस्त्याचे रुंदीकरण केले तर दळणवळणाला अधिक गती येणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी जळकाेट येथील तहसील कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले. लेखी पत्रानंतर हे आंदाेलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी विकास परिषदेचे अध्यक्ष संग्राम कदम, सचिव गजेद्र किडे,रामलिंग वाडकर, शिवलिंग बोधले, प्रभाकर धुळशेट्टे, संग्राम नामवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, माधव होनराव, धर्मपाल देवशेट्टे, सरपंच महताब बेग, बाळू देवशेट्टे काजम पटेल, श्री रंगवाळ यांच्यासह नागरिकांची माेठी उपस्थिती हाेती.