धरण उशाला...कोरड घशाला..., किल्लारीला महिन्याआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:04+5:302021-03-04T04:35:04+5:30
किल्लारीला हाेणारा पाणीपुरवठा यापूर्वीही थकीत वीज बिलापाेटी बंद हाेता. काही रक्क्म भरणा केल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला हाेता. ...

धरण उशाला...कोरड घशाला..., किल्लारीला महिन्याआड पाणी
किल्लारीला हाेणारा पाणीपुरवठा यापूर्वीही थकीत वीज बिलापाेटी बंद हाेता. काही रक्क्म भरणा केल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला हाेता. दरम्यान, २० जानेवारीपसून माकणी धरणाहून पाणी अद्यापही बंदच आहे. माकणी धरण ते किल्लारी दरम्यान पाणीपुरठा करणाऱ्या माळकाेंडजी येथील जलकुंभाच्या पाइपलाइनला ४० टक्के गळती लागली आहे. या पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी बराच कालावधी गेला. त्यानंतर दाेनच दिवस पाणी आले. ते पूर्व किल्लारीत काही गल्लींना मिळाले, ताेच महावितरणचे २४ फेब्रुवारी राेजी वीज कनेक्शन ताेडले आहे. परिणामी, किल्लारीचा पाणीपुरवठा पुन्हा खंडित झाला आहे.
औसा तालुक्यातील किल्लारी हे गाव माेठ्या बाजारपेठेचे आहे. प्रस्तावित तालुका म्हणून ओळख असलेल्या ३० हजार लाेकवस्तीच्या गावात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, दैनंदिन ४० गावांचा व्यवहार आहे. मात्र, पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती नित्याचीच आहे. पर्याय म्हणून किल्लारीतील अनेकांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. किल्लारीला पाणीपुरवठा हाेणाऱ्या ३० खेडी याेजनेच्या पाइपलाइनचा दर्जा निकृष्ट असल्याने सातत्याने पाइपला गळती, फुटण्याचा प्रकार घडताे. अनेकदा विद्युत माेटारही जळते, तर कधी ग्रामपंचायतीकडे थकबाकीमुळे पाणीपुरवठा बंद हाेताे.
१२५ रुपयांना ५०० लिटर पाणी...
किल्लारी येथील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. यासाठी ५०० लिटर पाण्याला १२५ ते १५० रुपये माेजावे लागत आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन फारसे गांभीर दिसून येत नाही. गेल्या २५ वर्षांपासून किल्लारीचा पाणीपुवठ्याचा प्रश्न प्रलंबित आहे. पाणी असूनही किल्लारीकरांना मात्र विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. याबाबत प्रशासन आणि शासनस्तरावर काहीही ताेडगा काढला जात नाही. परिणामी, किल्लारी येथील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त हाेत आहे.
वीज बिल भरल्यास हाेणार पाणीपुरवठा...
संबंधित वीजमंडळाने वीजपुरवठा खंडित केला आहे. तो पूर्ववत केल्यास पाणीपुरवठा सुरू करता येणार आहे. या याेजनेचा कारभार जिल्हा परिषद चालविते. तुमच्याकडील पाणपट्टी वसूल करून, वीज बिल भरले जाते. त्यामुळे किल्लारीकडे एक कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. तो काही प्रमाणात भरणा करावा, असे सांगण्यात आले आहे, असे माकणी धरणावरील अभियंता संगाप्पा कपाळे म्हणाले.
वीज बिलापाेटी काेट्यवधींची थकबाकी...
किल्लारी गावाला माकणी धरणातून ३० खेडी योजनेतून पाणीपुरवठा होतो. मात्र, या याेजनेची वीज बिलाची थकबाकी जवळपास एक कोटी ३० लाख रुपयांवर गेली आहे. परिणामी, पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. थकीत वीज बिलाची रक्क्म भरावी, असे सांगितले जात आहे. मात्र, एवढी रक्कम किल्लारी ग्रामपंचायत भरू शकत नाही, असे सरपंच शैलाताई लाेहार म्हणाल्या.