शिरुर अनंतपाळच्या आठवडी बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:35+5:302021-06-03T04:15:35+5:30
शिरुर अनंतपाळ : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने शासनाने लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. मंगळवारपासून बाजारपेठ दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ...

शिरुर अनंतपाळच्या आठवडी बाजारात गर्दी
शिरुर अनंतपाळ : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने शासनाने लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. मंगळवारपासून बाजारपेठ दुपारी २ वाजेपर्यंत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी येथील आठवडी बाजारात हाऊसफुल्ल गर्दी दिसत होती. अनेकांनी शासन नियमांकडे दुर्लक्ष करीत विनामास्क फिरताना दिसत होते तसेच फिजिकल डिस्टन्सचा बाेजवारा उडाला होता.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिरुर अनंतपाळ तालुक्यातील एका गावालाही कोरोनाचा संसर्ग रोखता आला नव्हता. कोरोना बाधितांची संख्या सर्वच गावात आढळून आली होती. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने बाधितांना गृहविलगीकरण, संस्थात्मक विलगीकरण तसेच कोविड रुग्णालयात दाखल केले होते. एप्रिल महिन्यात तर काहींना उपचारासाठी खाटा, ऑक्सिजन, रेमडिसिविर इंजेक्शन मिळाले नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून शासनाने मे महिन्यात कडक लाॅकडाऊन केले. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. विनामास्क फिरणाऱ्यांना दंड आकारण्यात आला. त्यामुळे आवश्यक कामाशिवाय कुणी फिरताना दिसत नव्हते. मे महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या काहींशी घटल्याने लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे सर्व दुकाने उघडली गेली आहेत. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी येथील भाजीपाल्याचा आठवडी बाजार असल्याने बुधवारी येथील बाजारात मोठी गर्दी दिसून आली.
काही जण विनामास्क...
बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी दुपारी २ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली असली तरी, कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्स राखावा, रस्त्यावर थुंकू नये, सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना आहेत. परंतु, बहुतांश जणांकडून एकाही नियमाचे पालन होत असल्याचे आढळून आले नाही.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे...
कोरानाचा धोका संपूर्णत: कमी झाला नसल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा. सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसीलदार अतुल जटाळे यांनी केले आहे.