अनुदान उचलण्यासाठी बँकेसमोर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:46+5:302021-05-06T04:20:46+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. ब्रेक द चेनअंतर्गत संचारबंदीही लागू करण्यात ...

Crowds of senior citizens in front of the bank to pick up the grant | अनुदान उचलण्यासाठी बँकेसमोर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी

अनुदान उचलण्यासाठी बँकेसमोर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. ब्रेक द चेनअंतर्गत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यात प्रशासनाकडून जनजागृती करून विनाकारण घराबाहेर पडू नका. तोंडास मास्क लावावा. फिजिकल डिस्टन्सिंग राखावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र बुधवारी शहरातील एका बँकेसमोर लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. एवढी गर्दी असतानाही पोलीस अथवा प्रशासनातील एकही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यानेही हे कसे काय पाहिले नाही? असा सवाल व्यक्त होत आहे.

निराधार योजनेच्या अनुदानाचे वाटप येथील एका बँकेमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांनी बँकेतून अनुदान उचलण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे यांतील काही लाभार्थी अन्नपाण्याविना उभे होते. भर उन्हात अनुदानासाठी थांबलेल्या या निराधारांना पिण्याच्या पाण्याची सोयही नव्हती. कोरोनाच्या संकटाच्या काळात निराधारांना अनुदानासाठी दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. हे अनुदान घरपोच देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

अनुदान घरपोच देण्याचे नियोजन

येथील बँकेच्या शाखेत दोन काउंटर पूर्वीपासून कार्यान्वित आहेत. लाभार्थ्यांना घरपोच अनुदान देण्यासाठी गावनिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु येथे आलेल्या लाभार्थ्यास परत पाठविता येत नाही, अशा प्रसंगी प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना शिस्त लावून सहकार्य करण्याची गरज आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी अशी शिस्त लावली होती, असे बँकेचे संचालक एन. एम. पाटील यांनी सांगितले.

बँकेस सूचना केल्या जातील...

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे. या संदर्भात बँकेच्या व्यवस्थापकांना गर्दी न करण्याच्या सूचना करण्यात येतील. तसेच निराधारांची अडचण होऊ नये याची दक्षता घेण्यात येईल. बँकेत आणखी दोन काउंटर सुरू करण्यासाठी सूचना करू, असे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे म्हणाले.

Web Title: Crowds of senior citizens in front of the bank to pick up the grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.