खंडीत वीजपुरवठ्यामुळे तेरा गावात पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST2021-05-07T04:20:18+5:302021-05-07T04:20:18+5:30

चाकूर : एकीकडे उन्हाची रखरख त्यातच दुसरीकडे कोरोनाचा कहर. अशा स्थितीत चाकूर तालुक्यातील तेरा गावातील ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती ...

Crisis of water scarcity in thirteen villages due to interrupted power supply | खंडीत वीजपुरवठ्यामुळे तेरा गावात पाणीटंचाईचे संकट

खंडीत वीजपुरवठ्यामुळे तेरा गावात पाणीटंचाईचे संकट

चाकूर : एकीकडे उन्हाची रखरख त्यातच दुसरीकडे कोरोनाचा कहर. अशा स्थितीत चाकूर तालुक्यातील तेरा गावातील ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढावली आहे. पाणीप्रश्न अतिशय गंभीर बनला असून, सतरा खेडी पाणी पुरवठा योजना अस्तित्वात असूनही तळ्यात पाण्याचा साठा असतानाही प्रशासनाच्या उदासिनतेमुळे अडीच महिन्यापासून विजपुरवठा खंडीत असल्याने लोकांवर पाण्याचे संकट ओढावले आहे.

धामणगाव नजिकच्या तळ्यावरून ही सतराखेडी पाणी पुरवठा योजना आहे. त्यातून चार गावाने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविली आहे. त्यामुळे या योजनेवर आता तेरा गावे अवलंबून आहेत. त्यात आटोळा, कबनसांगवी, अजनसोंडा खू., आंबेवाडी, कुंभेवाडी, नागेशवाडी, तिवघाळ, उजळंब, सावरगाव, लातूररोड, मोहनाळ, कडमुळी या गावांचा समावेश आहे. धामणगाव तळ्यात पाणीसाठा भरपूर आहे. जानेवारी महिन्याच्या अखेर वीज देयक बिल थकले म्हणून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जवळपास अडीच महिन्यापासून या योजनेचे पाणी पुरवठा बंद आहे. त्याची झळ तेरा गावातील ग्रामस्थांवर बसत आहे. कोरोनाच्या या स्थितीत अबालवृद्ध पुरुष, महिला, मुले पिण्याच्या पाण्यासाठी शिवारात भटकंती करत आहेत. मे महिना सुरु झाला. गावासह शिवारातील पाण्याचे स्त्रोत असलेले विहीर, बोअरचा पाणीसाठा कमी झाला आहे. गावानजिक पाणी उपलब्ध नाही. वाहनातून ५०० लिटर्स पाणी २०० रुपयाला विक्री केली जात आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांना दूरवर पायपिट करावी लागत आहे. तर या तेरा गावापैकी बहुतांश गावात पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी स्त्रोत नाहीत. वीजपुरवठा खंडीत केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या पाणीपुरवठा योजनेवरील वीजपुरवठा जोडणी करावी. यासाठी सरपंचानी पालकमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे जाऊन तक्रारी केल्या आहेत. वीजपुरवठा सुरु करण्यासाठी संबंधीत विभागाला सुचनाही दिल्या असून आदेशाला वीज विभागाने दाद दिली नाही. योजनेच्या विजेचे चालू बिल ३० लाख आहे. अखेर सरपंच मंडळीनी साडेचार लाख रुपये जमा करुन पंचायत समितीकडे दिले आहेत. पंचायत समितीनेही रक्कम जिल्हा परिषदला वर्ग केली आहे. मात्र, वीजपुरवठा करणारे ट्रान्सफार्मर जळालेले असून नवीन बसविण्याची गरज आहे. तळ्यातून पाण्याचा उपसा करणारी विद्यूत मोटारही जळालेली आहे. ती दुरुस्त करणे क्रमप्राप्त आहे. या उन्हापासून व कोरोनापासून बचाव करण्यासाठी वीज जोडणी करुन वीज पुरवठा अखंडपणे सुरू करणे अत्यावश्यक आहे. तरच या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल हे निश्चित आहे.

तात्काळ वीजजोडणी करावी...

सतराखेडी योजनेचा वीजपुरवठा जोडणी करावी. या योजनेचे पाणी सुरु झाले तर तेरा गावातील ग्रामस्थांची तहान भागणार आहे. अन्यथा या सर्व गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा. त्यासाठी विहीर, बोअर अधिग्रहण प्रक्रिया करावी. आणि टँकर्सद्वारे तरी पाणीपुरवठा सुरु करुन जनतेची तहान भागवावी. - वसुंधरा मुंडे, सरपंच, लातूररोड

विकतच्या पाण्यावर तहान..

या तेरा गावात पाण्याचे गावाजवळ स्त्रोत नाही. सध्या विजेअभावी पाणी पुरवठा योजना बंद आहे. वाहनातून पाणी आणून त्याची विक्री केली जात आहे. प्रशासनाने वीज जोडणी करुन ही योजना तात्काळ सुरु करावी. आणि जनतेला पाणीपुरवठा करावा. - रेणुका तोडकरी, सरपंच, आटोळा

पाणीप्रश्न गंभीर आहे. त्यात उन्ह आणि कोरोना यामुळे लोकांना झळ बसत आहे. या प्रश्नी आपण लक्ष घालून या योजने वरील वीजपुरवठा जोडणीसाठी प्रयत्न निश्चित करणार आहे. - आमदार बाबासाहेब पाटील

वीजेची थकबाकी आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत केला आहे. साडेचार लाख रुपये जमा झाले आहेत. ते वीज मंडळाला भरून वीज जोडणीसाठी विनंती करणार आहे. - डी.ई. आष्टके उपविभागीय अभियंता, जि.प. लातूर

Web Title: Crisis of water scarcity in thirteen villages due to interrupted power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.