कडक निर्बंधामुळे काळी-पिवळी चालकांपुढे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:32+5:302021-06-05T04:15:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क किल्लारी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९ महिने काळी-पिवळी टॅक्सी बंद राहिल्या. आता दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा या ...

Crisis in front of black-and-yellow drivers due to strict restrictions | कडक निर्बंधामुळे काळी-पिवळी चालकांपुढे संकट

कडक निर्बंधामुळे काळी-पिवळी चालकांपुढे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क

किल्लारी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९ महिने काळी-पिवळी टॅक्सी बंद राहिल्या. आता दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा या वाहनधारकांपुढे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि वाहनाची देखभाल कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यावसायिक संकटात सापडले आहेत. त्यात काळी-पिवळी चालकही अडचणीत सापडले आहेत. शासनाने या वाहनधारकांना ९ अधिक एक असा परवाना दिलेला आहे. दरवर्षी वाहनाची दुरुस्ती, रस्ता कर, विमा, पर्यावरण व व्यवसाय कर असे मिळून सरासरी ४० हजार रुपये खर्च होतात. गेल्यावर्षी कोरोनाचे संकट आले आणि ९ महिने ही वाहने बंद राहिली. त्यामुळे फायनान्सचे कर्ज, दुकानदारांची देणी कशी फेडायची आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न उभा राहिला होता. या परिस्थितीचा वाहनचालकांनी मुकाबला केला.

त्यानंतर कोरोनाची लाट ओसरल्याने पुन्हा या वाहनधारकांनी कर्ज काढून वाहनांची दुरस्ती केली आणि व्यवसाय सुरु केला. परंतु, अवघ्या काही दिवसांतच पुन्हा दुसरी लाट आली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी काळी-पिवळी वाहनाला ५ अधिक एक अशी प्रवासी वाहतुकीची अट लागू केली. त्यामुळे या वाहनधारकांवर वाहने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

वास्तविक किल्लारी ते लातूर या एका फेरीसाठी ८०० रुपये लागतात. त्यात पाच प्रवासी घेतल्यानंतर तिकिटाप्रमाणे ६०० रुपये मिळतात. अर्थात २०० रुपये तोटा होतो. याशिवाय, चालक, वाहनाचा मेन्टेनन्स हे वेगळे. त्यामुळे व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे निर्बंध कमी करावेत, अशी मागणी होत आहे.

शासनाने मदत द्यावी...

आतापर्यंत आम्ही करापोटी शासनाला रक्कम भरली. मात्र, आता व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने मासिक ५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी काळी-पिवळी संघटनेचे बालाजी चव्हाण, जनार्दन डुमणे, बालाजी आडे, शेखर कांबळे, मनोज राजपूत, वाजीदभाई, बबलू गायकवाड, राम पाटील, शिवाजी सेलूकर, महादेव माने यांनी केली.

भाजीपाला व्यवसाय...

काही वाहनचालकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आता भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. घरापुढे वाहन उभे करुन नाईलाजास्तव अन्य व्यवसाय करावा लागत आहे.

Web Title: Crisis in front of black-and-yellow drivers due to strict restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.