गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदणाऱ्या दहा जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:20+5:302021-05-14T04:19:20+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुग्गी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून सल्लाउद्दीन तांबोळी (रा. करडखेल, ता. उदगीर) हा ...

गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदणाऱ्या दहा जणांवर गुन्हा
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुग्गी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून सल्लाउद्दीन तांबोळी (रा. करडखेल, ता. उदगीर) हा काम करीत होता. त्याने देवणी तालुक्यातील जवळगा शिवारातील गोपाळराव पाटील यांच्या शेतात गुप्तधन आहे. ते काढण्यासाठी मंगळवारी अमावास्येच्या मुहूर्तावर लालू बाबू शेख (रा. मुळकी उमरगा) हे येणार आहे. खड्डा खोदण्यासाठी तुम्ही या, असे म्हणून प्रभाकर भुसेवाड, माधव महाले, गोविंद शेवाळे, उद्धव महाले, बालाजी श्रीरामे, बापू घडिले (सर्वजण रा. बोथी), कल्याण हाके (रा. शिरनाळ), ज्ञानेश्वर राठोड (रा. तोंडार) यांना बोलावून घेतले. मंगळवारी रात्री अमावास्येचा मुहूर्त साधून पूजा- अर्चा करून खड्डा खोदण्यासाठी सुरुवात केल्याची माहिती साकोळचे बीट जमादार बब्रुवान तपघाले यांना मिळाली. तेव्हा त्यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. तेथील हळद- कुंकू, नारळ, उदबात्ती हे पूजेचे साहित्य तसेच कुदळ, खोरे, टोपले आदी साहित्य जप्त करून दहा जणांना ताब्यात घेतले. या घटनेची शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात येऊन आरोपींना देवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
देवणी पोलिसांकडून तपास सुरू...
याबाबत देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सी. एस. कामठेवाड म्हणाले, गोपाळराव पाटील यांच्या शेतात खोदलेल्या खड्ड्यात गुप्तधन सापडले का, यात आणखी कोणी सहभागी आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे सांगितले.