औराद बाजार समितीच्या माजी सभापतीसह १५ जणांवर गुन्हा; लेखापरिक्षकांची फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 18:05 IST2021-12-16T18:05:00+5:302021-12-16T18:05:50+5:30
३८ लाखांच्या अपहाराचा ठपका

औराद बाजार समितीच्या माजी सभापतीसह १५ जणांवर गुन्हा; लेखापरिक्षकांची फिर्याद
लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी सभापतीसह १२ संचालक व दाेन माजी सचिवांवर ३८ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी लेखापरीक्षकांच्या फिर्यादीवरून औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे.
औराद शहाजानी बाजार समिती स्थापनेपासुन प्रथमच सभापती व संचालक मंडळ २०१४ मध्ये निवडून आले होते. लाेकनियुक्त संचालक मंडळाच्या १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील लेखा परिक्षण अहवालात ३८ लाख २७ हजार ५८२ रुपयांचा संगणमत करुन अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. यापैकी ४ लाख ४० हजार रुपयांचा भरणा करण्यात आला असून, उर्वरित ३३ लाख ८७ हजार ५८२ रुपयांचा अपहार करुन औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक केली. अशी फिर्याद लेखापरीक्षक श्रेणी-२, सहकारी संस्था औसाचे कमाल बहादुर पटेल यांनी औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात दिली.
यावरुन तत्कालीन सभापती प्रदीपकुमार पाटील, उपसभापती लक्ष्मण आकडे, तत्कालीन सचिव राजेंद्र तांभाळे, तत्कालीन संचालक ओमप्रकाश बिराजदार, मुमताज पठाण, सुमनबाई बिराजदार, रविंद्र गायकवाड, सुधाकर शेटगार, तत्कालीन सचिव रमेश तेलंग, तत्कालीन संचालक हलप्पा काेकणे, सुभाष डावरगावे, नुरअहमद पटेल, मैनाेदिन माेमीन, वामन तांभाळे, बालाजी म्हेत्रे यांच्यावर कलम ४२०, ४०९, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप कामत करीत आहेत.