निरोगी आयुष्यासाठी दारात गाय, कडुलिंब, तुळस आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:32+5:302021-06-03T04:15:32+5:30
आजच्या काळात आयुर्वेदिक वनस्पतींकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नवनवीन रोगांच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. खेड्यातील आयुर्वेदिक वनस्पतींचा ...

निरोगी आयुष्यासाठी दारात गाय, कडुलिंब, तुळस आवश्यक
आजच्या काळात आयुर्वेदिक वनस्पतींकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नवनवीन रोगांच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. खेड्यातील आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यास नवीन उद्भवणारे रोग होणार नाहीत. देवर्जन परिसरात असलेल्या हत्तीबेटाच्या डोंगरावरील आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन व्हावे, असेही राधाबाई पोतदार म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, आजच्या काळात प्रचंड वृक्षतोड होत आहे. झाडांची जंगले नष्ट होऊन सिमेंटची जंगले मोठ्या प्रमाणात होत आहेत. गाय, कडुलिंबाची झाडे आता नाहीशी झाली आहेत. केवळ तुळस पहावयास मिळते. गायीचे गोमूत्र, शेण, दुधामध्ये तसेच कडुलिंबाच्या व तुळशीच्या झाडांमध्ये फार मोठी ताकद आहे. या तिन्ही गोष्टींची जोपासना करणाऱ्याच्या घरातील माणूस आजारी पडत नाही. शिवाय, कोरोनासारखे आजार दूर राहतात.
विंचू चावल्यास धोत्र्याच्या पाल्याचा रस लावल्यास तत्काळ कमी होते. गोवर निघाली की, त्या बाळास शेळीचे दूध पाजल्यास उष्णतेने गोवर बाहेर पडून कमी होतो. आग्यापैन-नागविडा झाल्यास समदडीचा पाला दह्यात घालून कालवून पितळेच्या वाटीत ठेवून लावल्यास तत्काळ अंगातील आग कमी होते. खांडूक झाल्यास वाघाट्याचा पाला बारीक करून त्यात थोडे मीठ घालून दह्यामध्ये कालवून पट्टी बांधल्यास तत्काळ कमी होते. नखुरडे झाल्यास पिवळ्या फुलाच्या काटेपातराची पाने वाटून त्यात हळद घालायची व एरंडीच्या तेलामध्ये घालून पट्टी बांधायची ते तत्काळ कमी होते.
६० ते ७० रोगांवर आयुर्वेदिक उपचार...
जुलाब होत असल्यास सुंठ हिंग घालून वाटायचे. त्यात गूळ घालून लहान गोळ्या लिंबूच्या रसासोबत घेतल्यास तत्काळ कमी होते. अशा ६० ते ७० रोगांवर आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदिक वनस्पतींमुळे मी करीत होते. हत्तीबेटावर आयुर्वेदिक वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. नवीन पिढीने या वनस्पती जतन करून ठेवून त्यांचा उपयोग वेगवेगळ्या रोगांवर उपचार करण्यासाठी करावा, असे आवाहनही राधाबाई पोतदार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.