कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी आहे. मात्र, काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशा व्यक्तींना सातत्याने सांगून तसेच दंडात्मक कारवाई करुनही काहीजण दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे चाकूर येथील प्रशासनाने सोमवारी नवा मार्ग अवलंबिला आहे. शहरातील जुने बसस्थानकाजवळ उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, पोहेकॉ. हणमंत आरदवाड, गोरोबा जोशी, पाराजी पुट्टेवाड, मारोती तुडमे, माधव सारोळे, सुग्रीव मुंडे यांनी सोमवारी दुपारी अचानकपणे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पाहिले. त्यांनी अशाा २४ जणांना पकडले. त्यांची कोरोना तपासणी केली. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना तत्काळ येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले.
मोहीम सुरूच राहणार...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे ही कार्यवाही करण्यात आली. आता दररोज सकाळी ११ वा. नंतर ही मोहीम सुरू राहणार आहे, असे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी सांगितले.