समुपदेशन समिती नावापुरतीच मर्यादित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:20 IST2021-04-28T04:20:57+5:302021-04-28T04:20:57+5:30
चापोली : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात चाकूर तालुक्यातील सर्व गावांत प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे, तर बाधित मानसिकदृष्ट्या ...

समुपदेशन समिती नावापुरतीच मर्यादित
चापोली : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात चाकूर तालुक्यातील सर्व गावांत प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे, तर बाधित मानसिकदृष्ट्या खचत आहेत. त्यामुळे बाधितांच्या कुटुंबीयांना मानसिक आधाराची आवश्यकता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने बाधितांच्या समुपदेशनासाठी समिती गठित करण्याचे आदेश दिले. मात्र, या समित्या नावालाच दिसत आहेत.
चाकूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर काय करावे? कुठे जावे? कुणाकडे उपचार घ्यावे? कोणास सांगावे? कोण मदतीस धावून येईल? प्रकृती कशी आहे? अशा विविध शंका मनात येतात. सध्या तर रुग्णालयात खाटा, ऑक्सिजन तसेच औषधींचा अभाव असल्याचे सांगितले जात असल्याने रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यावर तेथेही मानसिक आधार मिळत नाही. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण असल्याने त्यांच्यात आणि रुग्णांत विसंवाद होतात. अशीच स्थिती चाकूर येथील कोविड केअर सेंटरची आहे. जवळपासच काही रुग्ण दगावल्याचे ऐकून उपचार घेत असलेल्यांवर मानसिक परिणाम होत आहे. नातेवाइकांना आतमध्ये जाता येत नाही. त्यामुळे रुग्णांना मानसिक आधारासाठी समुपदेशकाची गरज आहे.
रुग्णांना सातत्याने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला समुपदेशनासंबंधी योग्य ती अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिले आहेत. चाकूर तालुक्यात सात शिक्षकांच्या समुपदेशन समितीचे गठण करण्यात आले. परंतु, ती प्रत्यक्षात कार्यान्वित दिसत नाही.
रुग्णांची स्थिती नातेवाइकांना समजावी...
कोविड वॉर्डात दाखल रुग्णांची काय स्थिती आहे, याची कोणतीही माहिती नातेवाइकांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची तगमग होत असते. सदरील रुग्णांची माहिती मिळाल्यास नातेवाइकांची होणारी अडचण दूर होईल.
समुपदेशन समितीचे गठण...
आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून यासंबंधी आदेश आले आहेत. कोरोना केअर सेंटरमध्ये माइल्ड रुग्ण दाखल आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मानसोपचार तज्ज्ञ देण्यात आला नाही. त्यामुळे सात शिक्षकांची समुपदेशक समिती तयार केलेली आहे. दोन दिवसांपासून एखाद्या तज्ज्ञ समुपदेशकाचा शोध सुरू आहे.
- डॉ. अर्चना पंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी
केंद्रामध्ये दाखल झालेल्या रुग्णांना समुपदेशन करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ अथवा विशेष समुपदेशकाची नियुक्ती नाही. तेथील कर्तव्यावरील वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टरच रुग्णांचे समुपदेशन करतात.
- डॉ. दीपक लांडे, ग्रामीण रुग्णालय