कर वसुलीसाठी मनपाची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:16 IST2021-01-02T04:16:42+5:302021-01-02T04:16:42+5:30
शहरातील नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांकडे मोठ्या प्रमाणात कर थकलेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि दर महिन्याचे वीज बिल भरण्यासाठीही ...

कर वसुलीसाठी मनपाची मोहीम
शहरातील नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांकडे मोठ्या प्रमाणात कर थकलेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि दर महिन्याचे वीज बिल भरण्यासाठीही महापालिकेकडे निधी शिल्लक नाही. आवाहन करूनही कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. संबंधिताना नोटीस देऊनही करभरणा केला जात नसेल तर आस्थापना सील केल्या जात आहेत. या विशेष मोहिमेंतर्गत गुरुवारी औसा रोडवर कारवाई सुरू करण्यात आली. दुकाने सील करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दोन दुकानदारांनी १ लाख ६० हजार रुपयांचा मालमत्ता कर मनपाकडे सुपूर्द केला, तसेच राजीव गांधी चौकात एका मालमत्ताधारकाकडे थकीत असलेल्या कराचा भरणा न झाल्याने एका बँकेचे एटीएम सील करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये महापालिकेचे सहायक आयुक्त वसुधा फड, झोनल अधिकारी संजय कुलकर्णी, प्रकाश खेकडे, युनूस पठाण यांचा सहभाग होता.
कर भरणा करून सहकार्य करावे
शहरातील नागरिकांनी आपल्याकडे थकीत असणारा कर लवकरात लवकर भरून महापालिकेला सहकार्य करावे. करभरणा न केल्यास महापालिकेला कारवाई करावी लागेल. कारवाई टाळण्यासाठी कर भरणा करावा, असे आवाहन लातूर शहर महापालिकेच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.