लोकमत न्यूज नेटवर्क
उदगीर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उदगीर शहर व परिसरात धास्ती पसरली होती. मात्र, प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच तत्काळ आरोग्य सेवा दिल्यामुळे बाधितांची संख्या घटत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत येथील कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये केवळ ३७ रुग्ण आहेत. दरम्यान, रुग्णसंख्या जरी कमी होत असली, तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
उदगीरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली. एप्रिलमध्ये तर बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे प्रशासनाने शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोरोनावरील उपचारांची परवानगी दिली. त्यावेळी बाजारात रेमडेसिविरचा तुटवडा तर खासगी रुग्णालयांत खाटा व ऑक्सिजनची कमतरता पाहावयास मिळाली.
तालुक्यात आतापर्यंत १६ हजार ६९० जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६ हजार ९८९ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात २ हजार ३६९ बाधित आढळले तसेच ९ हजार ७०१ जणांच्या ॲन्टिजन तपासणीत १ हजार ६०५ बाधित आढळले. सर्वाधिक चाचण्या या एप्रिलमध्ये झाल्या आणि बाधितही अधिक संख्येने आढळले. दि. १ एप्रिल रोजी एकाच दिवसात ५६६ बाधित आढळले होते. यादिवशी सर्वाधिक बाधितांची नोंद झाली.
गुरुवारी सायंकाळपर्यंत कोविड रुग्णालयात २४२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ५४ जण एप्रिलमध्ये तर ८६ जण मे मध्ये दगावल्याची कोविड रुणालयात नोंद आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने महसूलच्या मदतीने प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या. रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून पालिका, पोलीस, कोविड रुग्णालयातील डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या.
धोका अद्याप टळलेला नाही...
कोरोनाबाधितांची संख्या जरी कमी होत असल्याचे दिसत असले, तरी नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. कारण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटाझजरचा वापर करावा. शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.
- प्रवीण मेंगशेट्टी, उपजिल्हाधिकारी.
लाट ओसरल्याचे दिसताच विवाह, समारंभ ग्रामीण भागात होत आहेत. नागरिकांनी गर्दीचे ठिकाण टाळावे. ४५ वर्षांपुढील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. १८ वर्षांवरील दिव्यांगांनीही लस घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आमची ग्रामीण भागातील यंत्रणा काम करत आहे. मास्कचा नियमित वापर करावा.
- डॉ. प्रशांत कापसे, तालुका आरोग्य अधिकारी.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यानंतर तपासणी करून घ्यावी. निर्बंध शिथील झाल्यानंतर बाजारपेठा खुल्या होतील, तेव्हा प्रत्येकाने मास्कचा वापर केलाच पाहिजे. तसेच लसीकरण करून घ्यावे. शासनाने येथे ऑक्सिजन टँकला मंजुरी देऊन रुग्णांची सोय केली. आम्ही ऑक्सिजनसाठी मागणी नोंदवली असून, दोन दिवसात येथे ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होईल. त्यामुळे भविष्यात येथे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. कोविड रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र घेतलेल्या परिश्रमांमुळे कोरोना संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला. सर्वच लोकप्रतिनिधींनी चांगले सहकार्य केले. जनतेनेही आता जागरुक राहणे गरजेचे आहे.
- डॉ. शशिकांत देशपांडे, नोडल अधिकारी, कोविड रुग्णालय.