वाढवणा आरोग्य केंद्राअंतर्गतच्या चार गावांनी कोरोनाला रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST2021-04-28T04:21:06+5:302021-04-28T04:21:06+5:30
उदगीर/ डोंगरशेळकी : उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या एकूण २० गावांपैकी चार गावांत अद्यापही कोरोनाचा संसर्ग झाला ...

वाढवणा आरोग्य केंद्राअंतर्गतच्या चार गावांनी कोरोनाला रोखले
उदगीर/ डोंगरशेळकी : उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या एकूण २० गावांपैकी चार गावांत अद्यापही कोरोनाचा संसर्ग झाला नाही. तेथील ग्रामपंचायतींकडून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे. उर्वरित १६ गावांत एकूण २८२ कोरोनाबाधितांची नोंद आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जास्तीत जास्त कोविड चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हिप्परगा, पीरतांडा, अनुपवाडी, होनी हिप्परगा, आदी चार गावांना प्रशासनाच्या सहकार्याने कोरोनाला दूर ठेवण्यात आजघडीला यश आले आहे.
वाढवणा बु. येथे ३७, केसगीरवाडी ८, डांगेवाडी ११, गुडसूर १५, डाऊळ ४, डोंगरशेळकी ३३, आडोळ तांडा ४, सोमनाथपूर ५३, एकुर्का रोड २३, इस्मालपूर २, कल्लूर ६, खेर्डा १०, किनी यल्लादेवी ६७, उमरगा मन्ना ९ अशा एकूण १६ गावांत २८२ कोरोनाबाधित आढळले आहेत. होम आयसोलेशनमध्ये ११०, तर वेगवेगळ्या हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरमध्ये १७२ रुग्ण उपचार घेत आहेत. बहुतांश रुग्णांची प्रकृृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा कानवटे यांनी दिली.
वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वाढवणा, किनी यल्लादेवी, एकुर्का रोड, डोंगरशेळकी व गुडसूर अशी एकूण पाच उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांत ही लसीकरण मोहीम, तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २ हजार ५२६ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी एकुर्का रोड येथील उपकेंद्रातही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तसेच गावागावांतून जनजागृती करून मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच फिजिकल डिस्टन्स ठेवणे याविषयी माहिती देण्यात येत आहे. लसीकरणाबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. उपकेंद्रात ही लस उपलब्ध करून देऊन तेथेही मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेण्यात येत आहे.
लक्षणे असल्यास तत्काळ उपचार घ्या...
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. मात्र, नागरिकांनी घाबरू नये. शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असतील तर तत्काळ आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत. गरज असेल तर कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन वाढवणा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा कानवटे यांनी केले.
वाढवणा बु. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण २० गावे आहेत. त्यांपैकी १६ गावांत कोविड रुग्ण आढळून आले आहेत. चार गावांत एकही रुग्ण आढळून आला नाही, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा कानवटे, डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.