corona virus : सुविधेत त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन; लातुरातील खासगी रुग्णालयाच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 14:58 IST2021-05-14T14:56:22+5:302021-05-14T14:58:46+5:30
corona virus : कोविड हेल्थ सेंटरच्या अनुषंगाने नियमांचे पालन केले नसून सुविधांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या

corona virus : सुविधेत त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन; लातुरातील खासगी रुग्णालयाच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द
लातूर : शहरातील सनराईज खासगी रुग्णालयात सुरू असलेल्या कोविड उपचारावरील हेल्थ सेंटरची मान्यता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रद्द करीत असल्याचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिले.
फायर सेफ्टी ऑडिटच्या समाधानकारक उपाययोजना आढळून आल्या नाहीत. रेमडेसिविरसाठी रुग्णालयात २८ आयसीयू बेड दाखविण्यात आले. प्रत्यक्षात १८ आयसीयू बेड निदर्शनास आले, असा अहवाल प्राप्त झाल्यावरून उपरोक्त कारवाई केल्याचे पत्रात म्हटले आहे.
उपजिल्हाधिकारी, अन्न औषध प्रशासनाचे निरीक्षक तसेच नोडल अधिकाऱ्यांनी ८ मे रोजी हॉस्पिटलला भेट दिली होती. त्यावेळी एकूण ६९ रुग्ण दाखल होते. परंतु, त्यावेळी रुग्णालयात केवळ दोन आरएमओ उपस्थित होते. आयसीयूमध्ये इन्टेसिव्हिस्ट आणि फिजिशियन उपस्थित नव्हते. फायर सेफ्टीच्या समाधानकारक उपाययोजना आढळून आल्या नाहीत. तसेच रुग्णांना रेमडेसिविरचा वापर प्रोटोकॉलनुसार नसल्याचे निदर्शनास आले. रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन बाहेरून आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्याचे दिसून आले. आयसोलेशनचे नियम पाळले जात नव्हते. रुग्णांजवळ रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. कोविड हेल्थ सेंटरच्या अनुषंगाने नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे १२ मे पासून सनराईज हॉस्पिटलमध्ये नवीन कोविड रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असेही जिल्हा शल्य चिकित्सकांनी म्हटले आहे.