कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; लातूरमध्ये सद्यस्थितीत ११ पॉझिटिव्ह रुग्ण
By हणमंत गायकवाड | Updated: April 4, 2023 19:35 IST2023-04-04T19:35:40+5:302023-04-04T19:35:57+5:30
११ पैकी तीन दवाखान्यात तर ८ रुग्ण गृहविलगीकरणात उपाचार घेत आहेत.

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; लातूरमध्ये सद्यस्थितीत ११ पॉझिटिव्ह रुग्ण
लातूर : जिल्ह्यात सद्य:स्थितीत व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले आहेत. शिवाय, कोरोनानेही डोके वर काढले असून, मंगळवारी १२६ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात अकरा रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी दिली. ११ पैकी तीन दवाखान्यात तर ८ रुग्ण गृहविलगीकरणात उपाचार घेत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७१३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक लाख ४६३९ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के आहे, तर २४८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची रुग्ण संख्या निरंक झालेली होती. मात्र, दोन-तीन दिवसांपासून बाधित रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी १२६ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यात ३ रुग्णांची विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत चाचणी झाली. त्यात तिघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर रॅपिड अँटिजन टेस्ट सर्वच निगेटिव्ह आल्या आहेत. रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाच्या संहितेचे पालन करावे. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, तसेच मास्क वापरावा, सर्दी, ताप,खोकला असल्यानंतर तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख यांनी केले आहे.