कोरोना होऊन गेला; इतर आजारावरील शस्त्रक्रिया करायची कधी? संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:21+5:302021-09-13T04:19:21+5:30
लातूर : कोरोना होऊन गेल्यानंतर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी, याबाबत संभ्रमच आहे. सध्या आरोग्य विभागाने नॉन कोविडच्या कामांना ...

कोरोना होऊन गेला; इतर आजारावरील शस्त्रक्रिया करायची कधी? संभ्रम कायम
लातूर : कोरोना होऊन गेल्यानंतर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी, याबाबत संभ्रमच आहे. सध्या आरोग्य विभागाने नॉन कोविडच्या कामांना सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांच्या इतर आजारावरील शस्त्रक्रियांबाबत भूमिका घेतली नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियांसाठी किमान दीड महिना तरी वाट पाहावी, असा सल्ला मात्र आरोग्य विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९२ हजार ८६ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ८९ हजार ५७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत २,४२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. सद्यस्थितीत ८४ रुग्ण उपचाराधिन आहेत. कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना इतर आजार आहेत. यातील काहींना शस्त्रक्रियेची गरज आहे. मात्र, कोरोना होऊन गेल्यानंतर किमान दीड महिना वाट पाहावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
इमर्जन्सी शस्त्रक्रिया...
कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल आल्यानंतर अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरूच आहेत. आरटीपीसीआरचा अहवाल ७२ तासानंतर येतो. त्यानुसार शस्त्रक्रिया करणे डॉक्टर योग्य की अयोग्य ते ठरवतात. जिल्ह्यात इमर्जन्सी शस्त्रक्रिया सुरू आहेत.
नियोजित शस्त्रक्रिया....
नियोजित शस्त्रक्रिया करताना ज्या चाचण्या आवश्यक आहेत, त्या केल्या जातात. आता कोरोना चाचणी बंधनकारक आहे. त्यानुसार नियोजित शस्त्रक्रियाही जिल्ह्यात सुरू आहेत.
शस्त्रक्रियेसाठी दीड महिना वाट पहा....
ज्या रुग्णांना कोरोना होऊन गेला आहे, परंतु इतर आजाराची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यांनी किमान दीड महिना वाट पाहावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. कोरोनामुळे प्रतिकारशक्तीत घट होते, अशक्तपणा येतो. तो भरून निघण्यासाठी किमान दीड महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी थोडी वाट पाहावी, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
कोट....
अत्यावश्यक, नियोजित शस्त्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहेत. नॉन कोविड कामांना बऱ्यापैकी सुरुवात करण्यात आली आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे आणि त्यांना शस्त्रक्रियेची गरज असेल तर त्यांनी किमान दीड महिना थांबावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. नॉन कोविडची कामे ऑक्टोबर महिन्यात यापेक्षा अधिक हाती घेतली जातील.
- डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक, लातूर