देवणी : तालुक्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र आहे. कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शून्यवर पोहचली असून, दोन दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याने देवणी तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु आहे. सद्य परिस्थितीत देवणी तालुक्यातील ५४ गावांपैकी दहा गावात २४ कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत ५४ गावात १ हजार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यापैकी १ हजार ४८७ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. देवणी तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तालुका प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल विभाग यांनी योग्य पद्धतीने नियोजन केले. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, देवणी तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.
कोरोना ओसरताेय; दोन दिवसांत एकही रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST