शिरुर अनंतपाळातील ४१ गावांपर्यंत पोहोचला कोरोनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST2021-04-20T04:20:50+5:302021-04-20T04:20:50+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ...

शिरुर अनंतपाळातील ४१ गावांपर्यंत पोहोचला कोरोनाचा संसर्ग
शिरूर अनंतपाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरात २६५ बाधित आढळून आले असून, रविवारी सहा गावांत नवीन ११ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तहसीलदार अतुल जटाळे यांनी कोरोना नियंत्रण समितीची बैठक घेऊन गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्याच्या सूचना केल्या आहेत. आता गृह विलगीकरणातील बाधितांचे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक समुपदेशन करणार आहेत.
तालुक्यात ४८ गावे असून, ४१ गावांत कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. ४१ गावांत २१९ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ३५ कोविड केअर सेंटरमध्ये आहेत. तसेच ११ कोरोनाबाधित जिल्हास्तरावरील संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
त्रिसूत्रीचे पालन करावे...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मास्क नियमित वापरावा. प्रत्येकवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत. संतुलित आहार घ्यावा, या त्रिसूत्रीचे पालन करून प्रत्येकाने मी जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाला हरविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन तहसीलदार अतुल जटाळे यांनी केले आहे.
संस्थात्मक विलगीकरणात योगासने...
येथील शिवनेरी महाविद्यालयात संस्थात्मक विलगीकरण कक्ष असून, तेथील रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून सकाळी एक तास फिजिकल डिस्टन्स ठेवून योगासने, प्राणायाम घेण्यात येत आहे. ३५ रुग्ण विलगीकरणात आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्याबरोबर सूर्योदयापूर्वी एक तास योगासने, प्राणायामाचे धडे दिले जात आहेत. योग शिक्षक विठ्ठलराव पाटील यांना तहसील कार्यालय आणि आरोग्य विभागाच्या वतीने योगासने, प्राणायामाचे धडे देण्यासाठी सुचित केले आहे. ते योगासन, प्राणायामाचे धडे देत आहेत.