कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:15+5:302021-06-01T04:15:15+5:30

लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. परिणामी मृत्युपत्र तयार करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोनापूर्वी महिन्याला ...

Corona increased premature death; The number of wills also increased | कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली

लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. परिणामी मृत्युपत्र तयार करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोनापूर्वी महिन्याला केवळ पाच ते सहा वर असणारी संख्या आता २५ ते ३० मृत्युपत्र तयार करण्यावर येऊन पोहचली आहे. परिणामी, हे प्रमाण १० ते १२ टक्क्यांवर पोहोचले असल्याचे विधिज्ञानी सांगितले.

पूर्वी मृत्युपत्र तयार करण्याचे प्रमाण कमी होते. कारण मृत्युपूर्वी मृत्युपत्र देण्याचे धाडसही सहसा कोणी दाखवत नसे. जर मुलगा नसेल व एखादा मुलगा अथवा मुलगी दत्तक घेतले असेल तर त्याच्या नावे मृत्युपत्र केले जात असे. तसेच दुसरा विवाह असेल तर त्या ठिकाणी काही ठिकाणी मृत्युपत्र केल्याचे निदर्शनास येते. या कारणामुळे मृत्युपत्र तयार करण्याचे प्रमाण ४ ते ५ टक्के होते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे घरातील व्यक्ती दगावत आहे. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत आहे. आपल्या पश्च्यात कुटुंबात मालमतेच्या वाटणीवरून वाद-विवाद होऊ नयेत म्हणून मृत्युपत्र करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनाच्यापूर्वी महिन्याला पाच ते सहा पत्र होत असत; पण सध्या यात वाढ झाली आहे. हे प्रमाण वाढले असल्याचे शहरातील विधिज्ञानी सांगितले.

दीड वर्षात झाली वाढ...

मृत्युपत्र करण्याचे प्रमाण पूर्वी चार ते पाच टक्के होते. मात्र, कोरोनामुळे यात कमालीची वाढ झाली आहे. साधारणपणे मागील दीड ते दोन वर्षात सदरील प्रमाण १० ते १२ टक्क्यांवर पोहचले आहे. चालू वर्षात तर हे प्रमाण आणखीन वाढणार असल्याचे शहरातील विधिज्ञानी सांगितले.

वकील प्रतिक्रिया...

मृत्युपत्र तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच शेतजमीन वाटणी करणे, मृत्युपत्र तयार करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मृत्युनंतर कुटुंबात वाद नको म्हणून अनेकजण हा निर्णय घेत आहेत. - ॲड. सुहास पाटील, लातूर

पूर्वी संपत्ती अधिक असेल तर मृत्युपत्र केले जात असे. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. हीच बाब लक्षात घेऊन अनेकजण मृत्युपत्र तयार करून घेत आहेत. ॲड. ज्ञानेश्वर निंगुळे, लातूर

५० व्या वर्षी मृत्युपत्र...

शहरातील एका ५० वर्षीय व्यक्तीला पत्नी, तीन मुली आहेत. त्यांनी आपले मृत्युपत्र तयार केले आहे. त्यात मुलीचा मुलगा दत्तक घेतला असून, सर्व संपत्ती पत्नीसह मुलींच्या नावे केली आहे.

६० व्या वर्षी मृत्युपत्र...

एक ६० वर्षीय व्यक्तीला तीन मुले आहेत. त्यांनी सर्व मुलांना समान शेतीची वाटणी केली आहे. तसेच शहरातील प्लॉट आणि इतर मालमत्ता समसमान पद्धतीने वाटप केल्या आहेत.

७५ व्या वर्षी मृत्युपत्र...

शहरातील एका ७५ वर्षीय व्यक्तीला दोन मुली आणि दोन मुले आहेत. मुले चांगल्या ठिकाणी नोकरीला असल्याने त्यांनी मुलांसोबत मुलींनाही संपतीमध्ये वाटा दिला आहे. त्यामुळे कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्युपत्रात समावेश आहे.

Web Title: Corona increased premature death; The number of wills also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.