माठ विक्रीस कोरोनाचे चटके, व्यवसाय पडला थंडगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:22+5:302021-04-10T04:19:22+5:30

उन्हाळा सुरु झाला की, सर्वसामान्य नागरिक थंडगार पाण्यासाठी माठांची खरेदी करतात. त्यातून काही प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. परिणामी, ...

Corona clicks for sale, business goes cold | माठ विक्रीस कोरोनाचे चटके, व्यवसाय पडला थंडगार

माठ विक्रीस कोरोनाचे चटके, व्यवसाय पडला थंडगार

उन्हाळा सुरु झाला की, सर्वसामान्य नागरिक थंडगार पाण्यासाठी माठांची खरेदी करतात. त्यातून काही प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. परिणामी, माठ निर्मिती करणा-या कुंभार समाजातील कुटुंबियांना रोजगार उपलब्ध होत असतो. विशेष म्हणजे, बदलत्या काळानुसार फ्रीज आला असला तरी माठातील पाणी चवीला चांगले असते. तसेच आरोग्यावर परिणाम होत नाही म्हणून नागरिक माठच खरेदी करतात. ग्रामीण भागातील नागरिकांची थंड पाण्यासाठी माठांचाच सर्वाधिक वापर करतात.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. दरम्यान, आता ब्रेक दि चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे ग्राहक घराबाहेर पडणे टाळत आहेत. परिणामी, सध्या बाजारपेठेत माठ खरेदीस काेणीही धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

माठ निर्मिती करणा-यांनी माती आणि भुसा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठांची निर्मिती केली आहे. परंतु, कोरोनामुळे ग्राहकांकडून मागणीच नसल्याने हे व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे यंदा तरी केलेला खर्च निघेल की नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

एप्रिल महिन्यास सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे. गोरगरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठाची शहरात दुकाने लागली आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ग्राहक खरेदी करीत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परिणामी, हा व्यवसाय संकटात सापडला आहे.

शहरातील कुंभार गल्लीत परिसरातील माठ विक्रेते हे स्वत: माठ तयार करुन शहरी व ग्रामीण भागात विक्री करतात. तसेच इतर विक्रेत्यांनाही पुरवठा करतात. बहुतांशजण पिढ्यांपिढ्या हा व्यवसाय करीत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य या व्यवसायासाठी राबतात. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र कोरोनामुळे हा व्यवसाय संकटात सापडला असल्याने छोटे- मोठे व्यावसायिक, विक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे मुलेही याच व्यवसायात...

माठांची निर्मिती करुन विक्री करणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. चार पिढ्यांपासून आम्ही हा व्यवसाय करतो. आमची मुले दुस-या व्यवसायात होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे ती पुन्हा आपल्या पारंपरिक व्यवसायात परतली आहेत. परंतु, आता माठ विक्रीवर परिणाम झाला आहे.

गेल्यावर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने हा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आला. आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून संसर्ग वाढू लागल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही उपासमारीचे चटके सोसावे लागतील की काय, अशी भीती माठ विक्रेते अशोक कानगुले यांनी सांगितले.

खर्चही निघेल की नाही...

शेती अथवा नदी काठावरून माती आणून त्यात राख कालवून त्याला आकार देणे, भट्टीत तापवणे अशी ही माठ बनवण्याची प्रक्रिया प्रचंड मेहनतीची व खर्चिक आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे माठ विक्रीत मोठी घट झाली आहे. खर्चही निघणार की नाही, अशी स्थिती आहे, असे माठ विक्रेते गोविंद कानगुले म्हणाले.

Web Title: Corona clicks for sale, business goes cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.