जिल्ह्यात कोरोना आला अन् डेंग्यू गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:38+5:302021-02-05T06:25:38+5:30
एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात डेंग्यू रुग्ण आढळत होते. मात्र, कोरोना काळातील लाॅकडाऊनमध्ये ...

जिल्ह्यात कोरोना आला अन् डेंग्यू गेला
एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात डेंग्यू रुग्ण आढळत होते. मात्र, कोरोना काळातील लाॅकडाऊनमध्ये डेंग्यू रुग्ण आढळले नाहीत. पाणी टंचाईमुळे नागरिक पाण्याचा साठा करून ठेवत असत. त्यातून डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढायचे. मात्र, सुदैवाने २०२० मधील एप्रिल, मे, जूनमध्ये पाणीटंचाई जाणवली नाही. परिणामी, डेंग्यू रुग्ण घटले अन् कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली होती. दरवर्षी जिल्हा हिवताप कार्यालयाकडे ७० ते ८० जणांना डेंग्यू आजाराचे निदान झाल्याची नोंद होत असे; पण २०२० मध्ये केवळ दोघाजणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले असल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयातून सांगण्यात आले.
आरोग्य सेवकांकडून तपासणी आणि सर्वेक्षण
लोकसंख्येच्या प्रमाणात घरांचा सर्व्हे आणि नागरिकांची तपासणी केली जाते. दर पंधरा दिवसाला ही तपासणी होते. २०२० मध्ये एप्रिल, मे, जून महिन्यांमध्ये मागच्या रुग्णांचा आकडा लक्षात घेता खबरदारी घेण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय ॲबेट देण्यात आले होते. त्यामुळे रुग्णसंख्येत घट आहे.
- डाॅ. आर. आर. शेख, जिल्हा हिवताप अधिकारी
डेंग्यूची लक्षणे
तीव्र स्वरूपाचा ताप येणे, डोके तसेच डोळ्यांच्या पाठीमागील भाग दुखणे, मळमळ आणि उलटी होणे ही प्रारंभीची लक्षणे आहेत.
तीव्र स्वरूपाचा डेंग्यू असेल तर बेशुद्ध पडणे, शरीरातून रक्तस्राव होण्याचा त्रासही डेंग्यूमुळे होतो.
डेंग्यू होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी
पाणी टंचाईमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात साठे केले जातात. हे पाणीसाठे घट्ट झाकणे, कोरडा दिवस पाळणे, कोरडा दिवस पाळणे शक्य नसेल तर गरजेनुसार ॲबेटिंग करणे.
पाणीसाठ्यामुळेच डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. डासांची अळी तयार होऊ नये म्हणून पाणीसाठ्यामध्ये ॲबेटिंग करणे किंवा त्या हौदामध्ये गप्पी मासे सोडणे, या उपाययोजनाही जिल्हा हिवताप कार्यालयाकडून सुचविल्या जातात.
नाले वाहते करणे, कुंडी, टायर, नारळाचे टरफल यामध्ये पाणी साचून डासोत्पत्ती होते. ती होऊ न देणे आणि कोरडा दिवस पाळणे.