विजेचा सातत्याने खेळखंडोबा, हाळी हंडरगुळीतील ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST2021-02-23T04:29:52+5:302021-02-23T04:29:52+5:30
हाळी येथील महावितरण कार्यालयातंर्गत हंडरगुळी, वाढवणा बु., वाढवणा खु., बेळसांगवी, गुडसूर, चिमाचीवाडी, मोरतळवाडी, वडगाव, शेळगाव आदी ३२ गावांचा समावेश ...

विजेचा सातत्याने खेळखंडोबा, हाळी हंडरगुळीतील ग्राहक त्रस्त
हाळी येथील महावितरण कार्यालयातंर्गत हंडरगुळी, वाढवणा बु., वाढवणा खु., बेळसांगवी, गुडसूर, चिमाचीवाडी, मोरतळवाडी, वडगाव, शेळगाव आदी ३२ गावांचा समावेश आहे. दहा हजारांपेक्षा अधिक घरगुती वीज ग्राहक असून चार हजारांपेक्षा जास्त कृषी जोडण्या असल्याचे सांगण्यात येते. येथील महावितरण कार्यालयास सध्या कायमस्वरूपी अभियंता नसल्याने ग्राहकांना विविध अडचणींचा समोरे जावे लागत आहे.
येथील अभियंता राजीव भुजबळे यांची नोव्हेंबर महिन्यात बदली झाली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात निलेश चामत हे रूजू झाले. मात्र महिनाभरापासून ते प्रशिक्षणासाठी गेल्याने सध्या शिरूर ताजबंद येथील अभियंत्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून हाळी हंडरगुळी गावात डीपी जळण्याचे प्रमाण वाढल्याने दिवस- दिवस वीज गायब होत आहे. वारंवार डीपी जळत असल्याने ग्राहकांना सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. हाळी गावातील घोगरे डीपी व हंडरगुळी गावातील डीपीत सातत्याने बिघाड होत आहे. या दोन डीपीवर निम्मे गाव अवलंबून आहे. मात्र, बिघाडामुळे निम्म्या गावाला अंधारात रहावे लागत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून आठ दहा दिवसांत नवीन चार डीपी पुरविण्यात आल्या. मात्र डीपींना भार सोसत नसल्याने त्यातही बिघाड झाला आहे.
नवीन डीपी देण्यात येईल...
शिरूर ताजबंदच्या मुख्य कार्यालयातील अभियंता शिवशंकर सावळे म्हणाले, नवीन डीपी देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मात्र सहाय्यक अभियंता पद भरण्याचे आपल्या अधिकारात नसल्याचे सांगितले.