घरकुल बांधकामास येणार आता गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:12+5:302021-03-06T04:19:12+5:30
जळकोट : रमाई, पंतप्रधान, यशवंत आवास योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी मोफत ५ ब्रास वाळू देण्याची शासन तरतूद आहे. ...

घरकुल बांधकामास येणार आता गती
जळकोट : रमाई, पंतप्रधान, यशवंत आवास योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी मोफत ५ ब्रास वाळू देण्याची शासन तरतूद आहे. त्यामुळे बांधकामासाठी ५ ब्रास वाळू देण्यासंदर्भातील प्रस्ताव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळताच लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घरकुल बांधकामास गती येणार आहे.
जळकोट तालुका डोंगरी असल्याने तालुक्यात वाडी- तांड्यांची संख्या अधिक आहे. तेथील बहुतांश नागरिक हे छपराच्या घरांत राहतात. पक्के घर नसलेल्या कुटुंबांसाठी शासनाच्या वतीने रमाई घरकुल आवास योजना, पंतप्रधान घरकुल, यशवंत आवास योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात. तालुक्यात रमाई आवास योजनेअंतर्गत ५३३ घरांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या घरांचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे, पण वाळूचे दर वाढले असल्याने आणि वाळू वाहतुकीस मनाई असल्यामुळे काही लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम रखडले आहे.
वाळूअभावी घरांचे बांधकाम थांबले असल्याचे पाहून जळकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी पात्र लाभार्थ्यांना मदत व्हावी म्हणून शासनाच्या एका आदेशानुसार लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास वाळू मोफत मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. सदर प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार आहे. त्यामुळे होणारी अडचण दूर होणार आहे.
लवकरच मंजुरी मिळेल...
तालुक्यात सदरील योजनेअंतर्गत ५३३ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, बांधकामासाठी वाळूची अडचण येत आहे. शासनाच्या एका आदेशानुसार मोफत ५ ब्रास वाळू देण्याची तरतूद आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळेल. त्यानंतर मोफत वाळूचे वाटप करण्यात येईल.
- चंद्रहार ढोकणे, गटविकास अधिकारी.