लातूर : वाढत्या शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास करण्यासाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी गंजगोलाई येथे प्रमुख पाच गॅरंटीसह ९ पानी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. थेट लातूरकरांशी संवाद साधून सर्वसामान्य नागरिक, महिला, व्यापारी, युवक, कामगार, उद्योजक आदींच्या सूचनांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला असून, हा जनतेकडून आलेला जनतेचा जाहीरनामा असल्याचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गंजगोलाई येथील जगदंबा मातेचे दर्शन घेऊन काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरनाम्याचे प्रकाशन प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. अमित देशमुख, खा.डॉ. शिवाजी काळगे, माजी आ. वैजनाथ शिंदे, अभय साळुंके, किरण जाधव, मोईज शेख, संतोष सूर्यवंशी, सचिन गायकवाड, निंबाळकर यांच्यासह काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उपस्थित होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, सक्षम आरोग्य व शिक्षण व्यवस्था, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सुयोग्य वाहतूक व्यवस्था, पाणी व्यवस्थापन, रोजगारनिर्मिती, सांस्कृतिक जतन आणि पारदर्शक, लोकाभिमुख प्रशासन आदी विषयांवर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. हा जाहीरनामा कालबद्ध पद्धतीने राबविला जाईल, असे आ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
या आहेत पाच गॅरंटी...मनपा भ्रष्टाचारमुक्त करून ई-सेवाच्या माध्यमातून घरपोच नागरी सुविधा पुरविल्या जातील. ‘लातूर केअर’च्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचा अपघात व आरोग्य विमा संरक्षण देणार. महिला, पुरुषांची वार्षिक आरोग्य तपासणी करणे, महिलांसाठी मोफत सिटी बससेवा सुरू करून व्याप्ती वाढविणे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्मार्ट वाहतूक प्रणाली राबविणार, ‘आऊटर’ रिंग रोड करणार, नवीन वसाहती मुख्य शहरांच्या बरोबरीने आणण्यासाठी घर तिथे पाणी, रस्ता, नाली, दिवे, कचरा व्यवस्था करणार, ‘लातूर कॅन्टीन’च्या माध्यमातून १५ रुपयांत जेवण देणार, उद्याने, सार्वजनिक अभ्यासिका, विविध समाजांसाठी भवन उभारणे, मनपा शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबविणे, फेरीवाले धोरण, सर्व समाजासाठी स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तानची व्यवस्था करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ८० फुटांचा पुतळा उभारणीसह परिसराचा पुनर्विकास करणे, तसेच शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे स्मारक उभारणे अशा विविध घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.
सत्ताधाऱ्यांकडून केवळ आकड्यांची घोषणाबाजी...महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी लोकांचा विचार न करता केवळ आकड्यांची घोषणाबाजी करीत असल्याची टीका आ. अमित देशमुख यांनी यावेळी केली. नुकत्याच लातुरात झालेल्या प्रचारसभेसाठी शहरभर अनधिकृत बॅनर लावून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले, हे चुकीचे आहे. या सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे कौतुक केले. या पत्रपरिषदेतील प्रश्नावर आ. देशमुख म्हणाले, महायुतीच्या मित्रांनी मुख्यमंत्र्यांचा इशारा समजून घ्यावा, असे सांगितले.
Web Summary : Congress-Vanchit alliance in Latur unveils manifesto with five guarantees: healthcare, free city bus for women, smart transport, home services, and affordable meals. The manifesto addresses key issues like infrastructure, healthcare, education, and employment, promising a corruption-free and people-centric administration.
Web Summary : लातूर में कांग्रेस-वंचित गठबंधन ने पांच गारंटी के साथ घोषणापत्र का अनावरण किया: स्वास्थ्य सेवा, महिलाओं के लिए मुफ्त सिटी बस, स्मार्ट परिवहन, गृह सेवाएं और किफायती भोजन। घोषणापत्र बुनियादी ढांचे, स्वास्थ्य सेवा, शिक्षा और रोजगार जैसे प्रमुख मुद्दों को संबोधित करता है, और भ्रष्टाचार मुक्त और जन-केंद्रित प्रशासन का वादा करता है।