चाकूर शहरातील प्रारुप मतदारयादीमध्ये घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:35+5:302021-03-10T04:20:35+5:30

लातूर जिल्ह्यातील चाकूरसह अन्य चार नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे. दुसऱ्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुका घेण्यासाठी सरकारकडून नवीन प्रारुप मतदारयाद्या प्रसिध्द ...

Confusion in the draft voter list in Chakur city | चाकूर शहरातील प्रारुप मतदारयादीमध्ये घोळ

चाकूर शहरातील प्रारुप मतदारयादीमध्ये घोळ

लातूर जिल्ह्यातील चाकूरसह अन्य चार नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे. दुसऱ्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुका घेण्यासाठी सरकारकडून नवीन प्रारुप मतदारयाद्या प्रसिध्द करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार नगरपंचायतीने प्रारुप मतदारयाद्या तयार केल्या आहेत. मात्र, चाकूर नगर पंचायतीने प्रसिध्द केलेल्या याद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्याचे समाेर आले आहे. ज्या प्रभागात लोक राहतात, त्या लोकांची त्याच प्रभागातील मतदार याद्यामध्ये नाव येणे हे क्रमप्राप्त आहे. तसे न होता बहुतांश लोकांची नावे दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. त्यामुळे अनेकांनी या यादीवर आक्षेपही नोंदविला आहे. त्यामुळे सदरील प्रसिध्द करण्यात आलेल्या याद्या प्रत्यक्ष प्रभागात न जाता कार्यालयात बसून तयार केल्या आहेत, असा आराेपही नागरिकांतून केला जात आहे. प्रभाग रचना करताना चाकूरच्या अधिकाऱ्यांनी नेमका कोणता निकष लावला आहे. हा संशोधनाचा विषय आहे. एक दोन नव्हे तर बहुतांश प्रभागात अशा चुका झाल्या आहेत. एका रस्त्यावर असलेले काही घरे एका प्रभागात तर काही घरे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील पती एका तर पत्नी दुसऱ्या प्रभागात कहर म्हणजे आई-वडील एकीकडे तर त्यांच्या मुलांची नावे दुसरीकडे समाविष्ठ करण्यात आली आहेत. याबाबत १ हजार ४० नागरिकांनी आपले आक्षेप नाेंदविले आहेत.

३१ मार्चपर्यंत मिळाली मुदतवाढ...

चाकूर नगरपंचायत प्रशासनाला नव्याने याद्या तयार कराव्या लागतील. अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शासनाने आक्षेप आल्यानंतर मतदान केंद्र निहाय अंतिम दुरुस्तीची मतदार यादी ८ मार्चला प्रसिध्द करण्याचे आदेश दिले होते. त्याऐवजी आता ३१ मार्चपर्यंत मुद्दतवाढ दिली आहे. या मुद्दतवाढीमुळे प्रशासनाला अचूक याद्या तयार करण्यासाठी आता बराच वेळ मिळणार आहे. या मुदतवाढीने निवडणुकाही आणखीन काही दिवस पुढे जाणार आहेत.

चाकूर नगरपंचायतीचे १७ प्रभाग आहेत. त्यात १५ हजार ६४० मतदार आहेत. प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंद करण्यात आले आहेत. मतदारांच्या आक्षेपावर पाच पथक नेमण्यात आली आहेत, असे निवडणूक विभागप्रमूख गणी शेख म्हणाले.

Web Title: Confusion in the draft voter list in Chakur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.