जळकोट तालुक्यात लिंगायत भवन बांधकामासाठी ५० लाख, बौद्ध विहार बांधकामासाठी व अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहासाठी ५० लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. मुस्लीम बांधवांच्या शादीखान्यासाठी व स्मशानभूमीच्या संरक्षक भिंत बांधण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देणार आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला असून, कच्चे रस्ते पक्के करण्यात येतील, तालुक्यातील विविध गावात रस्ते दुरुस्ती व इतर कामांसाठी मूलभूत योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला असून, शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते मूलभूत सुविधा, वृक्ष लागवड बेरोजगारांच्या हाताला काम व पिण्याच्या पाण्याच्या रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपर सहकार्य करणार असल्याचेही राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, चेअरमन अशोक डांगे, मन्मथआप्पा किडे, विठ्ठल चव्हाण, युवक तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील दळवी, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, धनंजय ब्रह्मंना, दिलीप कांबळे, गोविंद माने, आकाश वाघमारे, श्याम डांगे, दस्तगीर शेख उपस्थित होते.
प्रशासकीय इमारतीसाठी १६ कोटी...
जळकोट शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून शासकीय विश्रामगृहासाठी ७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून, या सर्व बांधकामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले.