लातुरात लसीकरणास आरंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST2021-01-17T04:17:41+5:302021-01-17T04:17:41+5:30
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान संस्थेत शनिवारी सकाळी १०.३० वाजता लसीकरण मोहिमेला वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित ...

लातुरात लसीकरणास आरंभ
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान संस्थेत शनिवारी सकाळी १०.३० वाजता लसीकरण मोहिमेला वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
पहिली लस उपअधिष्ठाता डाॅ. गिरीष ठाकूर यांनी घेतली. मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी अनिता गरड, अहमपूरच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमृत चिवडे, एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात डाॅ. मुकुंद भिसे, उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डाॅ. आरती वाडिकर, औसा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अंगद जाधव यांनी पहिली लस घेतली.
जिल्ह्यात लसीकरणासाठी ६ केंद्रांवर पहिल्या दिवशी सकाळपासून उत्सुकता होती. विलासराव देशमुख वैद्यकीय आयुर्विज्ञान संस्था ४८, औसा ७०, एमआयटी ६०, मुरूड ६५, अहमदपूर ५८ व उदगीर येथे ७८ असे एकूण ३७९ जणांचे लसीकरण झाले. सर्वांनी पहिल्या दिवशी लसीकरण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
लसीकरणाची उत्सुकता होती. सकाळी आयुर्विज्ञान संस्थेत १०.३० वाजता पहिली लस मी घेतली. दिवसभर कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेले लसीकरण आरोग्यासाठी फायद्याचे आहे. माझ्यापासून सुरुवात झाल्याचा आनंद आहे.
- डाॅ. गिरीष ठाकूर
उपअधिष्ठाता,लातूर
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मी औषध निर्माता म्हणून कार्यरत आहे. लस तयार करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, त्यांचा मला अभिमान आहे. पहिल्यांदा लस घेतेय याचा मला व माझ्या कुटुंबाला सार्थ अभिमान आहे. यात कसलीही भीती नाही.
- अनिता गरड,
औषध निर्माता, मुरूड
लसीबाबत सहा महिन्यांपासून उत्सुकता होती. त्यामुळे शनिवारी सकाळी मी व माझी पत्नी दोघांनीही प्रथम लस घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार लसीकरण झाले. आम्हाला कुठलाही त्रास जाणवला नाही. यातून कोरोना विरोधात सुरक्षितता वाढली आहे. हे सर्वांच्याच फायद्याचे आहे.
- डाॅ. अमृत चिवडे
वैद्यकीय अधिकारी, अ. पूर.
मी व माझे सहकारी कोरोनाविरुद्ध लढत आहोत. अनेकदा कोरोना रुग्णाच्या संपर्कात राहून मी उपचार केले. माझ्यासोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी सर्वप्रथम मी लस घेतली. आता लस उपलब्ध झाली असल्याने कुठलीही भीती नाही.
- डाॅ. आरती वाडीकर,
वैद्यकीय अधिकारी, उदगीर
जिल्ह्यासाठी २० हजार १८० डोसेस झाले प्राप्त
लातूर जिल्ह्यासाठी २० हजार १८० डोस प्राप्त झाले आहेत. हा डोस देण्यासाठी आरोग्य विभागाकडून केंद्रनिहाय नियोजन करण्यात आले आहे. त्यात केंद्रनिहाय डोस उपलब्ध करून देण्यात आले असून लातूर शहर महापालिकेला ७ हजार डोसेस उपलब्ध झाले आहेत. लसीकरणाची मोहीम आता सुरूच राहणार आहे.
———————————————
लसीकरणासाठी जिल्ह्यात सध्या ६ केंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणी दररोज किमान १०० जणांचे लसीकरण होईल.
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत लसीकरणासाठी शनिवारी सकाळी ८ वाजेपासून लगबग होती.
ही लस अत्यंत सुरक्षित आहे. लसीकरणामुळे कोरोनापासून बचाव होईल. त्यात भीतीचे कसलेही कारण नाही.
पहिला मान मिळाला याचा आनंद
लातूर : एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात शनिवारी लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज होती. त्यात पहिल्यांदा लसीकरणाचा मान मला मिळणार असल्याने मीही आनंदी होतो. लस घेतल्यानंतर कोरोनाविषयी असलेली भीती दूर झाली, असे डाॅ. मुकुंद भिसे यांनी सांगितले.
डाॅ. मुकुंद भिसे
एमआयटी, लातूर
——————-
लातूर : कोरोना काळात काम करीत असताना अनेकदा मनामध्ये संसर्गाची भीती वाटत होती. नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सेवा बजावली. औसा ग्रामीण रुग्णालयात मी पहिल्यांदा लस घेतली. अत्यंत सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे डाॅ. अंगद जाधव म्हणाले.
डाॅ. अंगद जाधव
वैद्यकीय अधीक्षक