जय बजरंगबली शेतकरी गटामार्फत खतांची एकत्रित खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:22+5:302021-06-04T04:16:22+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी कृषी साहाय्यक सूर्यकांत लोखंडे यांनी हरंगुळ खु. गावातील शेतकरी गटांचे अध्यक्ष व सचिवांच्या ...

जय बजरंगबली शेतकरी गटामार्फत खतांची एकत्रित खरेदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी कृषी साहाय्यक सूर्यकांत लोखंडे यांनी हरंगुळ खु. गावातील शेतकरी गटांचे अध्यक्ष व सचिवांच्या वेळोवेळी बैठका घेऊन एकत्रितरीत्या बी-बियाणे, खते खरेदी करण्याचे आवाहन करून मार्गदर्शन केले. त्या दृष्टिकोनातून ३० शेतकऱ्यांनी जय बजरंगबली शेतकरी गटाकडे खताची नोंदणी केली. कृषिमित्र महादेव बिडवे, वैभव पवार, आनंद पवार, उमाकांत भुजबळ, ‘आत्मा’चे तालुका तंत्र व्यवस्थापक सचिन हिंदोळे यांनी पुढाकार घेऊन विविध कृषी सेवा केंद्रांवर खताच्या किमतीबाबत चौकशी करून एकत्रितरीत्या १० टन विविध खते खरेदी करून गावातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले.
याप्रसंगी सूर्यकांत लोखंडे यांनी खरिपाच्या नियोजनाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. गावातील उपलब्ध सोयाबीन बियाणे, उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया यांबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी, असेही आवाहन केले. कीटकनाशकांवर होणारा वाढता खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातच निमार्क हे वनस्पतिजन्य कीटकनाशक तयार करून फवारणीसाठी वापरावे, असेही ते म्हणाले. या उपक्रमाचे तालुका कृषी अधिकारी महेश क्षीरसागर, मंडळ कृषी अधिकारी सचिन बावगे, कृषी पर्यवेक्षक प्रदीप रेड्डी यांनी कौतुक केले.