विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:25+5:302021-04-09T04:20:25+5:30
वलांडी व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. ...

विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांकडून दंड वसूल
वलांडी व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, काहीजण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. येथील बसस्थानक व बाजारपेठ परिसरात विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करीत १६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या पथकात ग्रामविकास अधिकारी बंडगर, मस्के, पोलीस प्रशासनाचे राजपाल साळुंके, तलाठी अब्रार शेख, गंगाधर विभूते यांचा सहभाग होता.
दरम्यान, गुरुवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४८ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात ११ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी दिली. या ११ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, येथील बाजारपेठेची महसूल, पोलीस व पंचायत समितीतील संयुक्त पथकामार्फत पाहणी करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत का, याची खात्री करण्यात आली. जी दुकाने बंद आहेत, त्यांनी ३० एप्रिलपर्यंत दुकाने सुरू करू नयेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील जी दुकाने सुरू आहेत, त्या दुकानदारांनी व कर्मचाऱ्यांनी १० एप्रिलपर्यंत कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यांच्याजवळ कोरोना चाचणी केल्याचा पुरावा नसल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली.