रेमडेसिविरच्या वापरासाठी आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST2021-04-15T04:18:56+5:302021-04-15T04:18:56+5:30

जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज, परिस्थिती नियंत्रणात लातूर : कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रण आणि उपचारासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. ...

Code of Conduct for the Use of Remedivir | रेमडेसिविरच्या वापरासाठी आचारसंहिता

रेमडेसिविरच्या वापरासाठी आचारसंहिता

जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज, परिस्थिती नियंत्रणात

लातूर : कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रण आणि उपचारासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. खाजगी रुग्णालयाच्या सहभागातून बेडची संख्या वाढविली जाईल. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून, रेमडेसिविरच्या वापरासाठी आचारसंहिता करण्यात आली असून, येणाऱ्या काळात लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी दिली.

रुग्णसंख्येचा वाढता वेग यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. परंतु, प्रशासन, पोलीस, वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा विश्वास आला असल्याचे सांगत पालकमंत्री पत्रपरिषदेत म्हणाले, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, मृत्यूचे प्रमाण १.७४ टक्के आहे.

येणाऱ्या २० एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशावेळी शहरातील दोनशे खाजगी रुग्णालयांनी बेडची संख्या वाढवावी. प्रत्येकाने किमान ५ बेड वाढवावेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत १५० बेड वाढविण्यात आले आहेत. एमआयटीसी संचलित रुग्णालयात कोविड सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. तेथून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता आहे. जिल्ह्याला ३० मे. टन ऑक्सिजनची गरज आहे आणि आपली जिल्ह्याची साठवणूक क्षमता ५४ मे. टन आहे. ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर निर्बंध आहेत. तसेच आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटरही उपलब्ध आहेत.

रेमडेसिविरचा गरजेनुसार वापर...

रेमडेसिविर व अन्य औषधांचा आवश्यकतेनुसार पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी अनावश्यक वापर होत असल्याने तुटवडा निर्माण होऊन गरजूंना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेमडेसिविर कधी वापरावे, याची नियमावली तयार करण्यास सांगितली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयांना मागणीनुसार इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी सूचना केल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, संस्थात्मक विलगीकरण केंद्राची संख्या वाढविली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

लॉकडाऊनची अंमलबजावणी

सर्व घटकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रशासनाला व पोलिसांना दिले आहेत. जनतेनेही त्यासाठी पुढाकार घ्यावा.

Web Title: Code of Conduct for the Use of Remedivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.