ढगाळ वातावरणामुळे उभी तूर वाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST2020-12-04T04:58:45+5:302020-12-04T04:58:45+5:30

उदगीर : चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून गेले आहे. काही भागात तर तुरीचा ...

The cloudy weather dried up the vertical tar | ढगाळ वातावरणामुळे उभी तूर वाळली

ढगाळ वातावरणामुळे उभी तूर वाळली

उदगीर : चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून गेले आहे. काही भागात तर तुरीचा खराटाच झाला आहे. सोयाबीन पाठोपाठ आता तुरीचेही नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.

यंदा पेरणीवेळी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. परंतु, ऐन काढणीच्यावेळी अति पाऊस झाल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. एकरी उत्पादन निम्मावर आल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या. खरीपातील सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा तुरीवर होत्या. परंतु, मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने वाढवणा, हाळी, हेर, देवर्जन, मोघा, नळगीर, नागलगाव, तोंडार, कुमठा, लोहारा, दावणगाव, रावणगावसह तालुक्यातील तुरीला फटका बसला आहे.

शेतातील तुरीचे उभे पीक वाळून सर्व पाने गळून गेली आहेत. तालुक्यात तुरीचा १३ हजार ५८१ हेक्टरवर पेरा झाला होता. ज्या शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी आपल्या पिकांना पाणी देणे सुरु केले आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना खराब हवामानाचा फटका बसला आहे. सोयाबीनचे उत्पन्न थोड्याफार प्रमाणात हाती आले. परंतु, तुरीचे पीक निसर्गाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण व धुके पडल्याने तुरीसह हरभरा पिकाला मोठा फटका बसला.

पुन्हा हातचे पीक हिरावले गेले...

यंदा सोयाबीनचे पीक चांगले होते. परंतु ऐन राशीच्या वेळी झालेल्या पावसाने नुकसान झाले. सोयाबीन डागी झाल्याने बाजारात दरही चांगला मिळाला नाही. आता आशा तुरीवर होत्या. परंतु, ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसांत तुरीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन केले असते तर काही तरी उपाययोजना केली असती, असे किनी यल्लादेवी येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारगुडे यांनी सांगितले.

Web Title: The cloudy weather dried up the vertical tar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.