आवर्त नावाचा मेघ धनधान्य वाढवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST2021-04-16T04:18:57+5:302021-04-16T04:18:57+5:30
उदगीर : खरिपाचा स्वामी शुक्र असल्याने यंदा पाऊस चांगला होऊन धनधान्याची वृद्धी होईल. ३ जूननंतर मंगळ कर्क राशीत आल्यानंतर ...

आवर्त नावाचा मेघ धनधान्य वाढवेल
उदगीर : खरिपाचा स्वामी शुक्र असल्याने यंदा पाऊस चांगला होऊन धनधान्याची वृद्धी होईल. ३ जूननंतर मंगळ कर्क राशीत आल्यानंतर कोरोनाचे देशातून उच्चाटन होईल, असा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविला आहे.
मेघ निवास धोब्याच्या घरी असून, रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे. त्यामुळे पाऊस पुष्कळ पडून धनधान्य समृद्धी होईल. १२ मार्च रोजी रोहिणी नक्षत्रात मंगळ आल्यानंतर देशात कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. ३ एप्रिलला मंगळ हा मृग नक्षत्रात आला आहे. मृग नक्षत्राचा स्वामी हा मंगळच आहे. मंगळ मृग नक्षत्रात आल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. १३ एप्रिल या गुडीपाडव्या दिवशी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करतो. देशाची मकर रास समजली जाते. त्यामुळे राशीनुसार मंगळ सहाव्या स्थानात म्हणजेच रिपू (शत्रू) स्थानात व रोगाच्या स्थानात राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रात त्याचा प्रादुर्भाव १७ मेपर्यंत राहणार आहे. पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी गुरू असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. ३ जून रोजी मंगळ कर्क राशीत येत असल्यामुळे देशातून कोरोनाचे समूळ उच्चाटन होईल आणि देशात व राष्ट्रात एकंदरित शांततेचे वातावरण निर्माण होईल, असा अंदाज हैदराबाद येथील प्रख्यात दत्तभक्त योगी डॉ. प्रमोद वाकनीस यांनी गुडीपाडव्याच्या दिवशी सरूरनगर येथील दत्त मंदिरात बोलताना व्यक्त केला. प्रारंभी आनंद व्यवहारे गुरुजी यांनी नवीन पंचांगाचे वाचन केले.