लातूर : दि. १६ जूनपासून रत्न आणि दागिने उद्याेगावर अनिवार्य हाॅलमार्किंग लागू केले आहे. मात्र, अद्यापही बऱ्याच समस्या साेडविण्यात आलेल्या नाहीत. भारतीय मानक ब्युराेने दागिन्यांच्या शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये अचानक बदल करताना ज्वेलरी उद्याेगाच्या संस्थांबराेबरच चर्चाही केली नाही. याविराेधात साेमवारी लातूर सराफ सुवर्णकार असाेसिएशनच्यावतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला हाेता. दिवसभर सराफा व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली हाेती. याबाबत असाेसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारच्यावतीने साेने-चांदीच्या व्यापाऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून चाप लावण्यासाठी वेगवेगळे जाचक कायदे केले जात आहेत. त्यातून छाेट्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. विशेषत: छाेट्या व्यापाऱ्यांना या कायद्याची पूर्तता करणे अवघड आहे. हाॅलमार्किंग आणि एसयूआयडी चिन्हांकित केलेले दागिने बनवून विकणे यापुढील काळात अत्यावश्यक व बंधनकारक करण्यात आले आहे. हा कायदा सामान्य व्यापारी, ग्राहकांना जाचक ठरणारा आहे. हाॅलमार्किंग सेंटर अत्यल्प आहेत. त्यामुळे हाॅलमार्किंगसाठी ५ ते १० दिवस वाट पाहावी लागेल. त्यामुळे व्यवसायाला अडचणी निर्माण हाेणार आहेत. एचयूआयडी नंबरचे दागिने माेडताेड झाल्यास स्क्रॅप करणे, वितळवणे ही प्रक्रिया क्लीष्ट झाल्याने व्यापारी आणि ग्राहकांना नाहक त्रास हाेणार आहे. छाेट्या-छाेट्या व्यापाऱ्यांना भांडवलाची मर्यादा आहे. या जाचक कायद्यामुळे छाेट्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद पडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कायद्यांतर्गत व्यापाऱ्यांवर दंडात्मक, गुन्हेगारी प्रकरणे दाखल हाेण्याची अधिक शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.