चापोली : कोरोनाच्या संकटामुळे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. परिणामी, सर्वसामान्यांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. व्यापारी, व्यावसायिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. भरमसाट वीजबिल व थकीत दुकानभाडे वसुलीसाठी सतत विचारणा केली जात असल्याने व्यावसायिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे किराणा, भाजीपाल्याशिवाय अन्य कुठल्याही खरेदीसाठी नागरिक येत नाहीत. तसेच दुकानेही बंद आहेत. गरजा कमी करण्यावर सर्वांचा भर आहे. हौस, मौजमजेचे दिवस नसल्याचे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे. व्यापारी, छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. त्यात दुकान मालकांकडून भाड्यासाठी तगादा सुरु आहे तर थकीत वीजबिलामुळे व्यापारी तणावाखाली आहेत. यात प्रामुख्याने फुले विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, मंडपवाले, कापड, सलून व्यावसायिक, जनरल स्टोअर्स, वाजंत्रीसह अन्य व्यावसायिकांचा समावेश आहे.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काहींनी पर्यायी व्यवसाय सुरू करून मार्ग काढला आहे. परंतु, हजाराेंचे डिपॉझिट देऊन गाळा भाड्याने घेतलेले व्यावसायिक अडचणीत आहेत. त्यामुळे वाद-विवाद चव्हाट्यावर येत आहेत.
व्यवहार ठप्प झाल्याने अडचण...
गेल्या वर्षापासून कोरोनामुळे व्यवसायाची घडी विस्कटली आहे. माझे भांडी विक्रीचे दुकान असून ऐन लग्नसराईत दुकान बंद असल्याने उत्पन्न नाही. पर्यायी काही करावे म्हटले तर अडचणी आहेत.- विक्रम चाटे, भांडी व्यावसायिक.
सर्व साहित्य गुंडाळून ठेवले...
विवाह, विविध धार्मिक कार्यक्रम असले की वाजंत्रींना बोलावयचे. परंतु, सध्या सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कुटुंबाची उपासमार होत आहे. घरात सहा सदस्य आहेत. कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न आहे.
- बालाजी कांबळे, वाजंत्री व्यावसायिक.
माठ निर्मितीचे चाक थंडावले...
लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांपैकी हातावर पोट भरणाऱ्या कुंभार समाज बांधवांवर संकट आले आहे. माठ निर्मितीचे चाक यंदा थंडावले आहे. मातीच्या माठांना मागणी नाही. त्यामुळे जगणे कठीण झाले आहे.
- हरिओम गोरगिळे, व्यावसायिक.
उदरनिर्वाह कठीण...
लॉकडाऊनमुळे सतत दुकान बंद ठेवावे लागत आहे. त्यामुळे उत्पन्न नाही. परिणामी, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, याची भ्रांत पडली आहे.
- सोमनाथ श्रीमंगले, सलूनचालक.