चार दिवसांपासून प्रभागातील बोअर बंद असल्याने नागरिकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:01+5:302021-05-05T04:32:01+5:30
निलंगा : निलंगा पालिकेने नवीन जलवाहिनीचे नळ कनेक्शन घेण्यासाठी शहरातील गांधीनगर प्रभागातील बोअर बंद केल्याने चार दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी ...

चार दिवसांपासून प्रभागातील बोअर बंद असल्याने नागरिकांची तारांबळ
निलंगा : निलंगा पालिकेने नवीन जलवाहिनीचे नळ कनेक्शन घेण्यासाठी शहरातील गांधीनगर प्रभागातील बोअर बंद केल्याने चार दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, पालिकेने सोमवारपासून नवीन जलवाहिनीच्या कामास सुरुवात केली आहे.
निलंगा पालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या जलवाहिनीचे नळ कनेक्शन घेण्यासाठी पालिकेकडून नागरिकांना सक्ती करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश नागरिकांनी नवीन नळ कनेक्शन घेतले आहे. मात्र, अद्यापही काही जण शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक घराने नवीन नळ कनेक्शन घ्यावे म्हणून पालिकेने चार दिवसांपूर्वी शहरातील सर्वच बोअरचे स्टार्टर काढून पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दरम्यान, विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या जवळील नागरिकांच्या घराजवळचे पालिकेने कनेक्शन सुरू ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरून पालिका दुजाभाव करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सोमवारी दुपारपासून गांधीनगर प्रभागात उर्वरित जलवाहिनीच्या कामास पालिकेने सुरुवात केली. आता जलवाहिनीचे काम सुरू करायचे होते, तर पाणी अगोदर का बंद केले, असा सवाल व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सदरील प्रभागातील विद्यमान नगरसेविका सविता अनिल उजळे यांच्या घरासमोरही आता जलवाहिनीच्या कामास सुरुवात करण्यात येत आहे.
पालिकेच्या या कारभाराबाबत वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका दक्ष झाली, तर काही नागरिकांनी नाइलाजास्तव नवीन नळ कनेक्शनसाठी अगोदरचे बोअर व नळ कनेक्शन असतानाही अनामत भरली आहे. सध्या कोरोनामुळे आर्थिक अडचण आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे नळ कनेक्शनसाठी पैसे कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
नागरिकांच्या दुर्लक्षामुळे काम अर्धवट...
डिसेंबरपासून आम्ही दवंडी देऊन नवीन नळ कनेक्शन घेण्याबाबत आवाहन करीत आहोत. त्यासाठी २२ पथकांची नियुक्ती करून घरोघरी जाऊन विनंती केली. मात्र, या भागातील नागरिकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे येथील जलवाहिनीचे काम अर्धवट राहिले होते. येथील बोअरचे कनेक्शन बंद केल्यानंतर नळ कनेक्शनची मागणी वाढली आहे. मागणी केल्यानंतर २४ तासांच्या आत कनेक्शन देण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील म्हणाले.