उदगीर शहरात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:07+5:302021-05-08T04:20:07+5:30
कोरोनाच्या विषाणूची साखळी तुटावी म्हणून राज्य सरकार सोबत जिल्हाधिकारी यांनीसुद्धा मागील काही दिवसांपासून अनेक निर्बंध लागू केली आहेत; मात्र ...

उदगीर शहरात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड !
कोरोनाच्या विषाणूची साखळी तुटावी म्हणून राज्य सरकार सोबत जिल्हाधिकारी यांनीसुद्धा मागील काही दिवसांपासून अनेक निर्बंध लागू केली आहेत; मात्र सहा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने शुक्रवारी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली होती.
मागील काही दिवसांपासून सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा देण्यात आली होती. त्याचाच गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी यांनी ८ मे पासून १३ पर्यंत केवळ वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व आस्थापना बंद करण्यात येत असल्याचे असे आदेश काढले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांनीसुद्धा खरेदी करण्यासाठी शहरात एकच गर्दी केली होती. पत्तेवार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुक्कावार चौक,चौबारा परिसर, किराणा मार्केट, मार्केट यार्ड, भाजी मार्केट आदींसह अनेक भागात नागरिकांनी किराणा, तेल, भाजीपाला, खाद्य पदार्थ, धान्य खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. या गर्दीत कोरोनाचा कुठलाही नियम नागरिक पाळत नसल्याचे दिसून येत होते. वास्तविक अशा गर्दीच्या ठिकाणाहूनच कोरोनासारख्या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणात होतो, नेमके हेच नागरिक विसरून गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत होते. केवळ वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व व्यापारी अस्थापना पुढील सहा दिवस बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या या आदेशात नमूद केल्यामुळे व १४ तारखेला अक्षय तृतीयाचा सण आणि ११ तारखेची अमावास्या झाल्यानंतर येणारा मुस्लीम समाजाच्या पवित्र महिन्यातील रमजान सण यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड उडवली होती. अनेक दिवसांनंतर छत्रपती शिवाजी चौक, मुक्कावार चौक, मेनरोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या दिसून येत होत्या.