सततच्या लाॅकडाऊनने वाढविले मुलांचे वजन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST2021-03-24T04:17:59+5:302021-03-24T04:17:59+5:30
लाॅकडाऊन आणि शाळा बंद असल्यामुळे मुलांची फिजिकल ॲक्टिव्हीटी पूर्णत: बंद आहे. मैदानी खेळच बंद झाला आहे. त्यामुळे मुलं आपसुकच ...

सततच्या लाॅकडाऊनने वाढविले मुलांचे वजन !
लाॅकडाऊन आणि शाळा बंद असल्यामुळे मुलांची फिजिकल ॲक्टिव्हीटी पूर्णत: बंद आहे. मैदानी खेळच बंद झाला आहे. त्यामुळे मुलं आपसुकच टीव्ही आणि मोबाईलच्या आहारी गेले आहेत. जेवण करतानाही अनेक मुलं मोबाईल हातात घेतल्याशिवाय जेवण करत नाहीत. टीव्ही पहातच जेवण असल्यामुळे मर्यादेपेक्षा अधिक खाणे होते. त्यामुळे वजनात वाढ झाली आहे. यावर उपाय घरगुती खेळांचा आहे. मुलांना योगासन, सूर्यनमस्कार, सायकलिंग, दोरी आदी खेळात व्यस्त करणे आवश्यक बनले असल्याचे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले.
व्यायाम करून घ्यावा
घरच्या घरी मुलांचा व्यायाम करून घेणे आवश्यक आहे. दोरी खेळणे, सूर्यनमस्कार, योगा, थोडीफार सायकलिंग करण्याकडे मुलांचा कल वाढविणे गरजेचे आहे. प्रोटिनयुक्त आहार त्यांना द्यावा. घरातील हलक्या छोट्या कामांमध्ये त्यांना व्यस्त ठेवावे. जेणेकरून मोबाईलचा वापर कमी होईल आणि चांगली सवयही लागेल.
मुलांना यापासून दूर ठेवा
स्निग्ध, तेलकट, तळीव पदार्थ मुलांना खावयास देऊ नयेत. ४५ मिनिटांपेक्षा अधिक काळ कोणत्याही स्क्रीनपुढे मुलांना बसू देऊ नये. टिव्ही किंवा मोबाईल पहात खाऊ घालू नये. मुलांची शारीरिक हालचाल होईल याकडे कटाक्ष ठेवावा. लाॅकडाऊन असला तरी आपल्या घरातील व्यक्तिंसोबत मुलांना खेळते ठेवावे. कमीत कमी ४० मिनिटे व्यायाम असावा.
सततच्या लाॅकडाऊनमुळे मुलांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मैदानी खेळावर निर्बंध आले आहेत. सतत मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनपुढे ते असतात. जेवणही टीव्ही पहात पहातच होते. यात खाऊपणा वाढतो. त्यामुळे वजन वाढत आहे. मुलांचा घरच्या घरी व्यायाम करून घेणे आवश्यक आहे.
- डॉ. वर्धमान उदगीरकर
बालरोग तज्ज्ञ
पालक मुलांना घराबाहेर जाऊ देत नाहीत. त्यामुळे मुलं टी.व्ही. मोबाईलमध्ये व्यस्त राहत आहेत. कोरोनामुळे पालक मुलांना मोबाईल पाहण्यासाठी देतात. परंतु, त्याचा दुष्परिणाम दिसत आहे. छिडछिडेपणा वाढत आहे. मुलं रागीट बनत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना घरगुती खेळामध्ये व्यस्त करावे.
- डॉ. जितेन जैस्वाल,
बालरोग तज्ज्ञ
घरातच बसून असल्याने मुलांचे वजन वाढत आहे. चिडचिडेपणाही आहे. त्यामुळे मुलांसोबत पालकांनी घरपरिसरात व्यायाम, सायकलिंग, दोरी आदी खेळ खेळावेत. मुलांच्या स्थूलपणाबाबत भाष्य करता येत नाही. परंतु, घरातच मुलं असल्यामुळे वजन वाढत आहे, ही वस्तूस्थिती आहे. यावर दक्ष असावे.
- डॉ.संदीपान साबदे