तीन महिन्यांपासून चांदोरी अंधारात, दळणासाठी शेजारील गावाकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST2021-08-29T04:21:19+5:302021-08-29T04:21:19+5:30
निलंगा : तालुक्यातील चांदोरी गावास वीजपुरवठा करणारे चारही डीपी जवळपास तीन महिन्यांपूर्वी जळाले आहेत. महावितरणने अद्यापही नवीन डीपी बसविले ...

तीन महिन्यांपासून चांदोरी अंधारात, दळणासाठी शेजारील गावाकडे धाव
निलंगा : तालुक्यातील चांदोरी गावास वीजपुरवठा करणारे चारही डीपी जवळपास तीन महिन्यांपूर्वी जळाले आहेत. महावितरणने अद्यापही नवीन डीपी बसविले नसल्याने गाव अंधारात आहे. नवीन डीपीसाठी गावकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, अद्यापही पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
चांदोरी हे ८०० उंबरठ्यांचे आणि ४ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावास चार डीपीवरुन वीजपुरवठा होतो. मात्र तीन महिन्यांपूर्वी एकाच आठवड्यात चारही विद्युत डीपी जळाले. त्यामुळे संपूर्ण गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले. याशिवाय, गावातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीद्वारे होणारा पाणीपुरवठाही बंद झाल्याने गावकऱ्यांना दररोजच्या वापरासाठी शेतातून पाणी आणावे लागत आहे. गावात असलेल्या दोन हातपंपावरुन काही भागाला पाणी मिळत आहे.
गावात वीजपुरवठा नसल्याने पिठाची गिरणीही बंद आहे. त्यामुळे धान्य दळण्यासाठी शेजारील बोरसुरी गावास जावे लागत आहे. वीज नसल्यामुळे गावातील मोबाइल बंद पडत आहेत. त्यामुळे इतरांशी संपर्क तुटला आहे. ज्यांना शक्य आहे, ते नागरिक परिसरातील गावातील मित्र, नातेवाईकांच्या यांच्या घरी जाऊन मोबाईल रिचार्ज करून येत आहेत. तसेच ऑनलाईन शिक्षणाचाही बोजवारा उडाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे...
गावातील या समस्येची व्यथा आ. अभिमन्यू पवार यांच्यापुढे गावातील नागरिकांनी तीन-चारवेळा मांडली. त्यांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. परंतु, विविध कारणे सांगून अधिकारी नवीन डीपी बसविण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ चारही विद्युत डीपी बसवून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सरपंच विजय सोळुंके यांनी केले आहे.