चाकूर : ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, म्हणून उदगीरच्या लाईफ केअरतर्फे टेली मेडिसीन आरोग्य उपक्रमाला येथे सुरुवात करण्यात आली आहे. त्याचा ३६ जणांनी लाभ घेतला.
येथील जगतजागृती विद्यालयात उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, डॉ. अर्चनाताई पाटील-चाकूरकर, साई फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील, जगतजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील, रुद्राली पाटील, संतोष जोशी, परमेश्वर स्वामी, मोहसीन शेख, मेरी फिरंगे, आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी मुळे म्हणाले, या उपक्रमामुळे रुग्णांना आता मोठ्या शहरात जावे लागणार नाही. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे वेळेवर निदान होईल. या उपक्रमाचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अर्चनाताई पाटील-चाकूरकर यांनी केले. दर शुक्रवारी चाकूर येथे हे शिबिर होणार असून, तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला मिळणार आहे.